बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा (Sidharth Malhotra) ‘शेरशाह’ (Shershaah) हा सिनेमा येत्या 12 ऑगस्टला ओटीटीवर रिलीज होतोय. कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे आणि युद्धभूमीवर शहिद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा (Captain Vikram Batra) यांच्या शौर्य गाथेवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. हा ट्रेलर पाहुन सर्वांचेच डोळे पाणावलेत. सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटात कॅप्टन बत्रा यांची व्यक्तिरेखा जिवंत केली आहे आणि ट्रेलर पाहुन चाहत्यांचे पाणावलेले डोळे सिद्धार्थच्या अभिनयाला मिळालेली दाद आहे. सिद्धार्थ मल्होत्राचा लुक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याशी तंतोतंत मिळताजुळता झाला आहे, हे या चित्रपटाचे लक्षवेधी वैशिष्ट्य आहे.
कॅप्टन बत्रा यांच्यासारख्या रिअल हिरोची भूमिका पडद्यावर जिवंत करणे सिद्धार्थसाठी सोपे नव्हते. त्याने या भूमिकेत अगदी जीव ओतला. चित्रपटाचे शूटींग सुरू करण्यापूर्वी बत्रा कुटुंबाची भेट, कर्नल संजीव जामवालकडून घेतलेले खडतर ट्रेनिंग हे सर्व सिद्धार्थने अगदी आनंदाने केले. सिद्धार्थ बत्रा यांच्या आईबाबाला भेटला. जुळ्या भावाला भेटला. खरं तर आपल्या लेकाची भूमिका सिद्धार्थनेच साकारावी, अशी कॅप्टन बत्रा यांच्या आई-बाबांची इच्छा होती. पहिल्यांदा त्यांनीच स्वत: सिद्धार्थशी संपर्क साधला होता. आपल्या लेकाच्या भूमिकेला सिद्धार्थ पुरेपूर न्याय देईल, हा विश्वास त्यांना होता आणि सिद्धार्थने तो सार्थ ठरवला. कॅप्टन बत्रा यांची भूमिका सिद्धार्थने पडद्यावर इतकी हुबेहुब जिवंत केली की, ट्रेलर पाहिल्यानंतर बत्रा कुटुंबीयांचे डोळे पाणावले. बत्रा यांची झलक सिद्धार्थमध्ये त्यांना दिसली. प्रेक्षकही कॅप्टन बत्रांच्या भूमिकेत सिद्धार्थला पाहून थक्क झालेत. बीटीएस व्हिडीओतही याची झलक पाहायला मिळते. रिअल टू रील ट्रॉन्सफॉर्मेशन दाखवणारा हा व्हिडीओ अंगावर शहरे आणतो. आता ही शौर्य गाथा रिलीजसाठी तयार आहे. अॅमेझॉन प्राईमवर येत्या 12 ऑगस्टला सिनेमा प्रदर्शित होतोय.
विष्णु वर्धन यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात सिद्धार्थसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. याशिवाय शिवपंडित, राज अर्जुन, प्रणय पचौरी, हिमांशु अशोक मल्होत्रा, निकितिन धीर, अनिल चरणजीत यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.सिनेमात कॅप्टन विक्रम बत्रा यांची हृदयद्रावक प्रेम कहाणीही पाहायला मिळणार आहे. बत्रा यांच्या प्रेयसीची भूमिका कियाराने जिवंत केली आहे. विक्रम बत्रा शहीद झाल्यानंतर त्यांची प्रेयसी डिंपल चिमा हिने आजही लग्न केलेले नाही.