बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन(Bigg Boss Marathi Season 5)चा ग्रॅण्ड फिनाले नुकताच पार पडला. यंदाच्या सीझनचा विजेता सूरज चव्हाण (Suraj Chavan) ठरला आहे. तर अभिजीत सावंत (Abhijeet Sawant) उपविजेता आणि निक्की तांबोळी (Nikki Tamboli) दुसरी उपविजेती ठरली आहे. सूरज चव्हाण विजेता झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. आता सूरज चव्हाण फक्त रिल्सस्टार नसून अभिनेता बनला आहे. लवकरच तो राजा राणी या चित्रपटात झळकणार आहे. याशिवाय केदार शिंदे त्याच्यासोबत एक सिनेमादेखील बनवत आहे. 'झापुक झुपूक' असे या चित्रपटाचे नाव असून हा सिनेमा येत्या २०२५ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान आता लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केदार शिंदे यांनी सूरजच्या निवडीवर भाष्य केले आहे.
केदार शिंदे म्हणाले की, सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये जाण्याआधी मी त्याला पहिल्यांदा भेटलो होतो. बऱ्याच जवळपासच्या लोकांचे म्हणणे होते की त्याला बिग बॉसमध्ये पाठवू नये. तो कसा रिअॅक्ट करेल हे माहित नाही. पण मी त्याच्याशी पाच दहा पंधरा मिनिटं बोलल्यानंतर त्याच्यात मला एक वेगळा अवलिया दिसला होता. त्याचक्षणी माझ्या डोक्यात ती गोष्ट सुरू झाली होती. माझ्याकडे सिनेमाची गोष्ट अशी आहे, ज्याला अशा पद्धतीचा माणूस मिळणे अपेक्षित होते. मी स्वामींना खूप मानतो. माझ्याकडे गोष्ट आहे म्हटल्यानंतर स्वामींनी अशी अलगद माझ्यासमोर आणून ठेवली.
ते पुढे म्हणाले की, योगायोगाने तो बिग बॉसमध्ये गेला. आज तो बिग बॉसचा विजेता आहे. मला असे वाटते की हे फक्त क्षणभंगूर राहू नये. एका व्यक्तीच्या बद्दल आपण विचार करतो तो फक्त तीन महिन्याचा राहू नये. त्या व्यक्तीमध्ये एक वेगळ्या गोष्टी दडलेल्या असतील तर माझ्यासाठीही हा वेगळा प्रयोग असेल. मला हे चॅलेंज घ्यायला, सूरजबरोबर काम करायला आवडेल. मलादेखील कोणीतरी अशी संधी दिली होती. माझे घराणे वेगळे असले तरी मला कोणी अचानक नाटक, सिनेमा दिले नव्हते. त्याच्यालेखी त्याने खूप धडपड केली असेल. त्यामुळे जेव्हा तो सिनेमा येईल तेव्हा सर्वांना जाणवेल की ही भूमिका फक्त सूरजच करु शकतो.