Join us

'RRR' सिनेमात असं आहे तरी काय? थिएटर मालकांनी स्क्रिनच्या सुरक्षेसाठी चक्क खिळ्यांचा बिछानाच बसवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 8:42 PM

दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण तेजा, ज्युनियर एनटीआर, बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत RRR हा चित्रपट उद्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे.

दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरण तेजा, ज्युनियर एनटीआर, बॉलीवूड अभिनेता अजय देवगण आणि आलिया भट्ट यांचा बहुप्रतिक्षीत RRR हा चित्रपट उद्या सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होत आहे. निर्माते, दिग्दर्शक आणि कलाकार सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. तब्बल ५५० कोटींहून अधिक खर्चून तयार करण्यात आलेल्या RRR चित्रपटाची क्रेझ चाहत्यांमध्ये आहे. चित्रपटानं तब्बल ६० कोटींहून अधिक रुपये केवळ अॅडव्हान्स बुकिंगमधून कमावले आहेत. यावरुनच चित्रपटाबाबतची उत्सुकता लक्षात येते. यातच एक अनोखी आणि कोड्यात टाकणारी माहिती समोर आली आहे. 

चित्रपटाबाबतची उत्सुकता पाहता काही उन्मादी चाहते चित्रपटगृहांमध्ये स्क्रिनचं नुकसान करण्याची हल्ली एक वेगळीच प्रथा झालीय. अतिउत्साही चाहत्यांकडून भर चित्रपटगृहात फटाके फोडणं, पडद्यावर दुधाचा अभिषेक करणं असे प्रकार घडले आहेत. त्यात RRR चित्रपटाची क्रेझ पाहून एका सिनेमागृहातच चक्क स्क्रिनजवळ कुणी येऊ नये यासाठी खिळ्यांचा बिछानाच रचला आहे. 

अन्नपूर्णा आणि शकुंतला थिएटर कॉम्प्लेक्सच्या मालकांनी चित्रपटगृहातील स्क्रिनच्या समोर खिळे ठोकून ठेवले आहेत. म्हणजेच स्क्रिनला चक्क काटेरी कुंपणच तयार केलं आहे. जेणेकरुण अतिउत्साही प्रेक्षक स्क्रिनच्या जवळ येणार नाहीत आणि होणारं नुकसान टाळता येईल. या हटके तयारीची छायाचित्रं देखील सोशल मीडियात व्हायरल झाली आहेत. 

"चाहते चित्रपटाचा आनंद घेत असतात, पण काही जण स्क्रिनच्या अगदी जवळ जाऊन हैदोस घालतात. यामुळे स्क्रिनचं नुकसान होतं आणि सर्वांना व्यवस्थित चित्रपटही पाहता येत नाही. त्यामुळे आम्ही प्लायवूडच्या फळ्यांवर खिळे ठोकून ते स्क्रिनच्या समोर ठेवले आहेत. जेणेकरुन कुणी अतिउत्साही प्रेक्षक स्क्रिनचं नुकसान करू शकणार नाहीत. प्रेक्षकांच्या भावना आम्ही समजू शकतो पण त्यामुळे होणारं नुकसान थिएटर मालकांना परवडणारं नाही", असं थिएटर मालक अदुसुमिल्ली श्रीराम म्हणाले. सिनेमागृहांमध्ये आता 2D आणि 3D स्क्रिन वापरण्यात आल्या आहेत. ज्या थेट अमेरिकेहून आयात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या स्क्रिनला होणारा नाजूक स्पर्श देखील मोठं नुकसान करू शकतो. प्रेक्षकांनी चित्रपटाचा मनमुराद आनंद लुटावा असं आम्हाला वाटतं. पण त्याचवेळी स्क्रीनची काळजी घेणं आम्हाला भाग आहे, असंही ते म्हणाले. 

 

टॅग्स :आरआरआर सिनेमाबॉलिवूड