- जान्हवी सामंतहिंदी चित्रपट- मॉम२०१२मध्ये आलेल्या ‘इंग्लिश-विंग्लिश’ या चित्रपटानंतर अभिनेत्री श्रीदेवी कपूर ही ‘मॉम’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. वास्तविक, चित्रपटाची कथा फार विलक्षण किंवा अद्वितीय नाही. कारण काही महिन्यांपूर्वीच रीलीज झालेल्या अभिनेत्री रविना टंडन हिच्या ‘मातृ’ या चित्रपटाशी काहीशी साम्य साधणारी आहे. मात्र अशातही चित्रपटातील अभिनय, संगीत आणि कथेतील भक्कमपणा चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो, हेही तेवढेच खरे आहे. चित्रपटाची कथा कॉलेज शिक्षिका देवकी सभ्रवाल (श्रीदेवी) आणि तिची सावत्र मुलगी आर्या (सजल अली) हिच्या अवतीभोवती फिरणारी आहे. बायोलॉजीची शिक्षिका असलेली देवकी आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारी असते. दिल्ली येथे दोन मुली आणि नवऱ्याबरोबर राहणाऱ्या देवकीचे वैवाहिक जीवन खूपच सुखी असते. देवकीची आर्या नावाची मोठी मुलगी तिच्या नवऱ्याच्या पहिल्या बायकोची असते. मात्र अशातही देवकी तिच्यावर पोटच्या मुलीप्रमाणेच प्रेम करीत असते. ती १८ वर्षांची असल्याने तिच्याविषयी ती नेहमीच सजग असते. परंतु आर्याला तिची सावत्र आई फारशी आवडत नसते. मुळात देवकीबरोबर तिच्या वडिलांनी (अदनान सिद्दिकी) केलेला विवाहच तिला खटकणारा असतो. एक दिवस आर्या तिच्या मित्रांबरोबर व्हॅलेंटाइन डेच्या पार्टीला जाते. या ठिकाणी मोहित नावाचा मुलगा आणि त्याचे काही सहकारी तिची छेड काढतात. वास्तविक, मोहित तिला यापूर्वीदेखील अश्लील मॅसेजेस पाठवित असतो. मोहितचे हे वागणे तिला अजिबात आवडत नाही. ती त्याला विरोध करते. परंतु याचाच राग मनात ठेवून मोहित आणि त्याचे सहकारी आर्याचे अपहरण करतात. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून जखमी अवस्थेत तिला एका नाल्यात फेकून देतात. पुढे हे प्रकरण न्यायालयात जाते. परंतु पब्लिसिटीच्या जोरावर मोहित खटला जिंकतो. न्यायावरचा विश्वास उडालेली ‘मॉम’ गुन्हेगारांना शिक्षा देण्याचा निश्चिय करते. यासाठी ती एका डिटेक्टिव्ह दयाशंकर कपूर (नवाजुद्दिन सिद्दिकी) याची मदत घेते. पुढे मॅथ्यू फ्रान्सिस (अक्षय खन्ना) या पोलीस अधिकाऱ्याचीही एंट्री होते. त्यानंतर कथेत काय ट्विस्ट येत असतील हे नव्याने सांगण्याची गरज नाही. वास्तविक, चित्रपट दोन्ही भागांत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. यामध्ये दिग्दर्शक रवी उदयवार याच्या दिग्दर्शनाचा मोठा वाटा म्हणावा लागेल. कारण साधारण संवाद अतिशय मनोरंजकपणे सांगण्यात तो यशस्वी होताना दिसतो. श्रीदेवी आणि नवाजुद्दिन यांचे मोजकेच सीन्स असतानाही त्याला ज्या पद्धतीने सादर केले गेले ते वाखणण्याजोगे आहे. वास्तविक, नवाजुद्दिन आणि अक्षय खन्ना यांच्या वाट्याला खूपच कमी भूमिका आली आहे. अशातही हे दोन्ही कलाकार बाजी मारून जाताना दिसतात. मात्र चित्रपटाचा खरा नायक हा अभिनेत्री श्रीदेवीच आहे, यात काहीही शंका नाही.
...अशीही असते आई!
By admin | Published: July 09, 2017 1:24 AM