सवाई जिंकू शकणारी, पण चौकटीत न बसलेली 'J4U'

By प्रसाद लाड | Published: January 29, 2019 03:31 PM2019-01-29T15:31:31+5:302019-01-29T15:33:11+5:30

या  'J4U' एकांकिकेच्या निमित्ताने एकांकिकेची चौकट किंवा मीटर या गोष्टींवर चर्चा व्हायला हवी, हे मात्र नक्की.

'J4U' may win Sawai one act play competition but not happen beacause of rules | सवाई जिंकू शकणारी, पण चौकटीत न बसलेली 'J4U'

सवाई जिंकू शकणारी, पण चौकटीत न बसलेली 'J4U'

googlenewsNext

मुंबई : एकांकिका म्हणजे प्रयोग करण्याचे उत्तम व्यासपीठ असे म्हटले जाते. वेगवेगळे प्रयोग आतापर्यंत एकांकिकांच्या माध्यमातून आपण साऱ्यांनी पाहिले आहेत. पण जेव्हा एखादी संस्था असे प्रयोग करते तेव्हा त्यांना एकांकिका स्पर्धेची चौकट दाखवली गेली आणि त्यांना स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून बाहेर काढले गेले. असेच काहीसे घडले ते सवाई एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत. एकांकिका होती पुण्याच्या थिएट्रॉन एंटरटेन्मेंट संस्थेची 'J4U'. ही एकांकिका तिन्ही परीक्षकांच्या पसंतीला उतरली होती. परीक्षक चिन्मय मांडलेकर यांनी आवर्जुन या एकांकिकेचा उल्लेख व्यासपीठावर केला होता. पण स्पर्धेच्या चौकटीत ही एकांकिका बसली नाही आणि त्यामुळेच 'सवाई' होण्याचा मान 'J4U' या एकांकिकेला मिळू शकला नाही.

यंत्राच्या मागे लागून आपण माणूसपण हरवत चाललो आहोत, हा या एकांकिकेचा गाभा होता. पण त्यांनी ज्यापद्धतीने या एकांकिकेचे सादरीकरण केले होते, ते स्तुत्य असेच होते. लयदार सुरावटींमध्ये ही एकांकिका संगीतबद्ध केली होती. एक कॅब चार प्रवासी शेअर करत असतात. त्यामधील तीन व्यक्ती समवयस्क (युवा) असतात. पण त्यांच्यामधील माधव ही व्यक्ती त्यांच्यापेक्षा 15-20 वर्षांनी मोठी असते. तिन्ही व्यक्ती आपल्या तांत्रिक जगात जगत असताना माधव त्यांना आयुष्य, नातं, व्यक्ती, आपलेपणा या गोष्टी आपल्या खुमासदार शैलीत समजवून सांगते. त्यामुळे काही क्षणांपूर्वी माधव यांच्याबद्दल अपशब्द वापरणाऱ्या या तिन्ही व्यक्ती त्यांच्या प्रेमात पडतात. तंत्रज्ञानापेक्षा ते घडवणारा माणूस महत्वाचा आहे, हा संदेश या एकांकिकेमधून देण्यात आला होता.

एकांकिकेचं एक मीटर असतं, असं म्हणतात. पण जर एकांकिका हे प्रयोग करण्याचे व्यासपीठ असेल तर  मीटरमध्ये एकांकिका सादर व्हावी, हा अट्टाहास का? या प्रश्नाचे उत्तर मिळालयला हवे किंवा किमानपक्षी या विषयावर चर्चा तरी व्हायला हवी. किंवा थिएट्रॉन एंटरटेन्मेंट या संस्थेला त्यांची एकांकिका सर्वोत्तम ठरू शकत नाही, हे स्पष्टपणे स्पर्धेपूर्वीच सांगायला हवे होते, तसे घडू शकले नाही. आपण पुरोगामी असल्याची भाषा करतो, प्रयोगांची भाषा करतो, मग अजूनही चौकटीमध्ये आपण का जखडून पडलो आहोत, या गोष्टीचा विचार करायला हवा. जर चौकट नसली असती तर  'J4U' सर्वोत्तम ठरली असते. जर-तर, या गोष्टींना महत्व नसते. पण या  'J4U' एकांकिकेच्या निमित्ताने एकांकिकेची चौकट किंवा मीटर या गोष्टींवर चर्चा व्हायला हवी, हे मात्र नक्की.

Web Title: 'J4U' may win Sawai one act play competition but not happen beacause of rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे