Sinhasan, Jabbar Patel, Nana Patekar : ‘सिंहासन’ हा मराठीतील गाजलेला सिनेमा. मुख्यमंत्रीपद मिळविण्यासाठीचा सहकारी मंत्र्यांचा आटापिटा खुद्द मुख्यमंत्रीच हाणून पाडतात आणि या सगळ्या कटकारस्थांनाकडे तटस्थपणे पाहत असलेल्या एका राजकीय पत्रकारास अखेरीस चक्क वेड लागते, असा हा अंतर्मुख करणारा ‘सिंहासन’ म्हणजे एक अजरामर राजकीयपट. अरुण सरनाईक, श्रीराम लागू, निळू फुले, मोहन आगाशे, नाना पाटेकर सारख्या दिग्गजांची मांदियाळी असलेल्या या सिनेमाला नुकतीच ४४ वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्त मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरला संवाद कार्यक्रम आयोजित केला होता. ‘सिंहासन’चे दिग्दर्शक जब्बार पटेल आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार कार्यक्रमात उपस्थित होते. या निमित्तानं ‘सिंहासन’विषयीच्या अनेक आठवणी आणि किस्से सांगितले गेलेत.४४ वर्षांपूर्वी या सिनेमावर किती खर्च झाला होता, ते त्यांनी सांगितलं. चित्रपटाने किती कमाई केली, यावर मात्र त्यांनी मजेशीर उत्तर दिलं.
जब्बार पटेल म्हणाले..."44 वर्षांपूर्वी सिनेमा तयार केला, तेव्हा सिनेमासाठी सेटचा खर्च कसा करायचा? कलाकार मंडळींचे पैसे कसे द्यायचे, प्रदर्शित झाल्यानंतर हा सगळा खर्च निघेल का ? असे अनेक प्रश्न होते. मात्र तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी मंत्रालय, मंत्र्यांचे बंगले, सह्याद्री गेस्ट हाऊस चित्रिकरणासाठी उपलब्ध करून दिलं. मुख्य सचिवांकडून याला नकार दिला गेला होता. तरीही शरद पवार यांनी मोलाची मदतकेली. या सिनेमावर तेव्हा सव्वा चार लाख रूपये खर्च झाला होता आणि हा सिनेमा ४५ आठवडे चालला," असं जब्बार पटेल म्हणाले. या सिनेमातून कमाई किती झाली असा प्रश्न जब्बार पटेल यांना विचारण्यात आला, या प्रश्नावर मात्र त्यांनी मजेशीर उत्तर दिलं. "या दिवसात इन्कम टॅक्सबद्दल बोलणं जरा अडचणीचं आहे. मला कुठल्या कोठडीत अडकवू नका. मुलीने (सुप्रिया सुळे) सांगितलंय तुम्ही काही बोलू नका", असं ते म्हणाले. त्यांच्या या उत्तराने सभागृहात एकच हशा पिकला.
नाना पाटेकरांना किती मिळालेलं मानधन?या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनीही उपस्थिती लावली होती. त्यांनी या सिनेमाच्या मानधनाबद्दल खुलासा केला. ते म्हणाले, "सिंहासनसाठी मानधन म्हणून मला तीन हजार रुपये ठरले होते. तेव्हाच्या काळात ती मोठी रक्कम होती. शंभर रुपयांत तेव्हा चार माणसांचे महिन्याचे रेशन यायचे. परंतु मुद्दा असा की, त्या मानधनातील दोन हजार अद्याप मला मिळालेले नाहीत. सिंहासन हा माझ्या सिनेप्रवासातील दुसरा सिनेमा होता. पण, त्यानंतर जब्बार पटेल यांनी त्याच्या सिनेमात मला घेतले नाही."