जॅकी श्रॉफचा आज वाढदिवस असून त्याचे खरे नाव किशन काकूभाई श्रॉफ आहे. त्याचे वडील गुजराती तर आई कझाकस्थानमधील आहे. जॅकी श्रॉफच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बेताची होती. पण त्याने आपल्या मेहनीच्या बळावर स्वतःचे बॉलिवूडमध्ये एक स्थान निर्माण केले. जॅकीच्या घरची आर्थिक परिस्थिती खराब होती. त्यामुळे त्याला अकरावीत असताना शिक्षण सोडावे लागले. त्याने अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या आहेत. देवआनंद यांच्या स्वामी दादा या चित्रपटाद्वारे जॅकीने त्याच्या चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. त्यानंतर सुभाष घई यांनी हिरो या चित्रपटात त्याला काम करण्याची संधी दिली. या चित्रपटाने जॅकी श्रॉफचे आयुष्य संपूर्णपणे बदलले.
जॅकी श्रॉफची लाईफ स्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. चाळीतल्या या मुलाने इंडस्ट्रीत असे काही पाय रोवले की, सगळेच थक्क झाले. ‘हिरो’ सुपरहिट झाल्यावर प्रत्येक निर्माता-दिग्दर्शक जॅकीला साईन करण्यासाठी उत्सुक होते. इतके की, अनेकजण जॅकीच्या घरापर्यंत पोहोचत. त्यामुळे जॅकी एका चाळीतील छोट्याशा खोलीत राहात असे.
‘जॅकी श्रॉफने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत काही महिन्यांपूर्वी सांगितले होते की, मी आजही तीन बत्तीतील माझ्या चाळीतील घरी अनेकवेळा जातो. मी तिथे बरेच वर्षे राहिलेलो आहे. हिरो बनल्यानंतरही राहिलो आहे. सुपरस्टार झाल्यानंतरही डब्बा पकडून टॉयलेटला जाण्यासाठी लाईनमध्ये उभा रहायचो. अनेकवेळा तर मला साईन करण्यासाठी निर्माते घरी येत असे आणि त्यांच्यासमोरच मी कॉमन टॉयलेटला जायचो. टॉयलेट अनेकजणांचे मिळून होते. त्यामुळे मोठी लाईन लागत असे. तीस एक लोक होते आणि सात खोल्या होत्या. सात खोल्या पार करून जावं लागत होतं. चाळीत असताना मी कधीच विचार केला नव्हता की मी इतका मोठा हिरो बनेन.