जॅकी श्रॉफचा आज वाढदिवस असून त्याचे खरे नाव किशन काकूभाई श्रॉफ आहे. त्याचे वडील गुजराती तर आई कझाकस्थानमधील आहे. जॅकी श्रॉफच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय बेताची होती. पण त्याने आपल्या मेहनीच्या बळावर स्वतःचे बॉलिवूडमध्ये एक स्थान निर्माण केले. जॅकीच्या घरची आर्थिक परिस्थिती खराब होती. त्यामुळे त्याला अकरावीत असताना शिक्षण सोडावे लागले. त्याने अनेक छोट्या मोठ्या नोकऱ्या केल्या आहेत. देवआनंद यांच्या स्वामी दादा या चित्रपटाद्वारे जॅकीने त्याच्या चित्रपटसृष्टीतील करियरला सुरुवात केली. त्यानंतर सुभाष घई यांनी हिरो या चित्रपटात त्याला काम करण्याची संधी दिली. या चित्रपटाने जॅकी श्रॉफचे आयुष्य संपूर्णपणे बदलले.
जॅकी श्रॉफच्या आयुष्यात घडलेली एक घटना तो आजदेखील विसरू शकलेला नाही. आयुष्यभर तो हे दुःख विसरू शकत नाही असे त्याने एका मुलाखतीत सांगितले होते. जॅकीने सांगितले होते की, माझ्यापेक्षा एक मोठा मला एक भाऊ होता. तो १७ वर्षांचा असताना त्याचे निधन झाले. तो आणि मी एकदा समुद्रकिनारी गेलो होतो. तेव्हा माझ्या भावाला एक माणूस पाण्यात बुडताना दिसला होता. त्याला वाचवण्यासाठी त्याने पाण्यात उडी मारली. पण माझ्या भावाला पोहोता येत नव्हतं. त्यामुळे तो पाण्यात बुडायला लागला. मी तिथेच होतो, मी प्रचंड घाबरलेलो होतो. पण तरीही मला एक केबल वायर पडलेली दिसली. ती मी त्याला पकडण्यासाठी पाण्यात फेकली. पण ही वायर काहीच सेकंदात माझ्या हातातून सुटली. माझ्यासमोर माझा भाऊ बुडाला. पण मी काहीच करू शकलो नाही. त्यावेळी मी खूपच छोटा होतो. माझा भाऊ एका मिलमध्ये काम करत होता. त्याच्या निधनाच्या एक महिने आधीच त्याला ही नोकरी मिळाली होती.
जॅकी श्रॉफने अग्निसाक्षी, खलनायक, अल्लारखाँ, कर्मा, परिंदा, राम लखन यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.