Join us

'भिडू' शब्दावर जग्गूदादाचा कॉपीराईट ? अभिनेता जॅकी श्रॉफ यांची दिल्ली हायकोर्टात धाव!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 2:41 PM

जॅकी श्रॉफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या बुधवारी (१५ मे) सुनावणी होणार आहे.

'बॉलिवूडचा भिडू' म्हणून अभिनेते जॅकी श्रॉफ यांना ओळखलं जातं. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे, वेगळ्या अंदाजामुळे, स्टाइलमुळे जॅकी श्रॉफ नेहमी चर्चेत असतात. त्यांची स्टाइल चाहत्यांना खूप आवडते. यातच आता जग्गूदादाने हायकोर्टात धाव घेतली आहे. कारण, अनेक जण परवानगीशिवाय त्यांचं नाव, आवाज आणि चेहरा किंवा पर्सनॅलिटीचा वापर करतात. पब्लिसिटी आणि पर्सनॅलिटी राईट्ससाठी  जॅकी श्रॉफ यांनी हे पाऊल उचललं आहे. परवानगीशिवाय कोणीही त्यांचा आवाज, नाव किंवा ओळखीचा वापर करू नये, अशी मागणी त्यांनी या याचिकेतून केली आहे. 

जॅकी श्रॉफ यांनी दाखल केलेल्या याचिकेवर येत्या बुधवारी (१५ मे) सुनावणी होणार आहे. भिडू या शब्दाचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करणाऱ्या लोकांविरोधात हा खटला दाखल करण्यात आला आहे. जॅकीच्या  नावाचा, फोटोंचा, आवाजाचा तसंच भिडू या शब्दाचा गैरवापर होत असून पब्लिसिटी हक्कांचं उल्लंघन होत असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. 

जॅकी श्रॉफ हे पहिले अभिनेता नाहीत, ज्यांनी या प्रकारची याचिका दाखल केली आहे. याआधी अमिताभ बच्चन यांनीही आपल्या हक्कांबाबत याचिका दाखल केली होती. त्यांनी 2022 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ज्यामध्ये त्यांच्या परवानगीशिवाय फोटो, नाव, आवाज वापरू नये, अशी मागणी केली होती. हा आदेश देताना दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्तिमत्त्वाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी अंतरिम आदेश जारी केला होता.

टॅग्स :जॅकी श्रॉफसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमा