जॅकी श्रॉफ हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि नामांकित नाव आहे. ८०च्या दशकात अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून त्यांनी बॉलिवूड स्थान निर्माण केलं. प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या जग्गू दादांचा बॉलिवूडमधील हा प्रवास मात्र अजिबातच सोपा नव्हता. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले जॅकी श्रॉफ हे सुरुवातीला मुंबईतल्या चाळीत राहायचे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य करत चाळीतील काही किस्सेही सांगितले.
जॅकी श्रॉफ यांनी नुकतीच Ranveer Allahbadia च्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. या मुलाखतीत त्यांनी चाळीतील एक प्रसंगही शेअर केला. ते म्हणाले, "मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा मी बाथरुमसाठी रांग लावायचो. ७ बिल्डिंगमध्ये तीनच टॉयलेट होते. रोज सकाळी या टॉयलेटच्या बाहेर रांगा लागायच्या. कारण, लोकांना कामाला जायची घाई असायची. ही आठवण अजूनही तशीच आहे. अजूनही कधी कधी मला मी माझ्या स्वप्नांच्या रांगेत उभं असल्याचं जाणवतं".
चाळीतील या घरात राहत असताना एकदा उंदराने चावल्याचा किस्सा देखील जॅकी श्रॉफ यांनी शेअर केला. "माझी आई जेवण बनवायची आणि मी जमिनीवर बसून जेवायचो. या आठवणी मी विसरू शकत नाही. मी जमिनीवरच झोपायचो. एकदा उंदराने माझा आणि आईचा चावा घेतला होता. ६०च्या दशकातील ही गोष्ट आहे. ज्या ठिकाणी मी लहानाचा मोठा झालो तिथे अजूनही मी कधी कधी जातो. मी त्या मालकाला मला ती जागा भाडे तत्वावर देण्यासही सांगितलं होतं. पण, त्याने नकार दिला. मी अजूनही यासाठी प्रयत्न करत आहे", असंही ते म्हणाले.