जान्हवी कपूर, सलमान खानचे 'बॅड लक'; कृषी कायद्यांच्या विरोधात बंद पाडले शुटिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 09:32 AM2021-01-24T09:32:59+5:302021-01-24T09:33:44+5:30
Good Luck Jerry Movie Shooting : शेतकऱ्यांनी सेटवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली तेव्हा जान्हवीदेखील समोर होती. टीमच्या सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, आंदोलक शेतकरी शुटिंग बंद करण्यावर अडून बसले.
अभिनेत्री जान्हवी कपूर आणि दबंग स्टार सलमान खान यांच्या चित्रपटाचे शुटिंग शेतकऱ्यांनी बंद पाडले आहे. 15 दिवसांपूर्वीच जान्हवीच्या आगामी ‘गुड लक जेरी’ सिनेमाचं शूटिंग पंजाबमध्ये सुरू झाले होते. शेतकऱ्यांना याची भनक लागताच जोपर्यंत नवे कृषी कायदे रद्द होत नाहीत तोपर्यंत सिनेमाचे शुटिंग होऊ देणार नाही, अशी भूमिका घेत सेटवर मोर्चा वळविला आणि शुटिंग बंद पाडले. महत्वाचे म्हणजे सलमान खानही पुढील आठवड्यात या सिनेमाच्या शुटिंगसाठी पटियालाला जाणार आहे.
अभिनेत्री जान्हवी कपूर हिची आज बॉलिवूडमध्ये स्वत:ची एक वेगळी ओळख आहे. ‘धडक’ या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणारी जान्हवी आज एक स्टार आहे. गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर रिलीज झालेला तिचा 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' हिट ठरला होता. सिनेमाचे शूटिंग पंजाबमध्ये सुरू झाले आहे. सिनेमाचे पहिले शेड्यूल मार्च 2021 पासून सुरू होईल. सिद्धार्थ सेन गुप्ता या सिनेमाचे दिग्दर्शन करीत आहेत. दीपक डोब्रियाल, मीता वशिष्ठ, नीरज सूद आणि सुशांत सिंह हे या सिनेमात दिसणार आहेत. चित्रपटाची निर्मिती रंग यलो प्रॉडक्शन, लिका प्रॉडक्शन आणि सनडियल एंटरटेन्मेंट यांनी केली आहे.
शेतकऱ्यांनी सेटवर गोंधळ घालण्यास सुरुवात केली तेव्हा जान्हवीदेखील समोर होती. टीमच्या सदस्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. मात्र, आंदोलक शेतकरी शुटिंग बंद करण्यावर अडून बसले. बराचवेळ हा गोंधळ सुरु असल्याने सिनेमाचा क्रू बारादरीयेथील निमराना हॉटेलमध्ये परतले. काही वेळाने शेतकऱ्यांनी निमराना हॉटेल गाठले आणि घोषणाबाजी केली. जेव्हा पोलिसांनी शेतकऱ्यांना शुटिंग बंद केल्य़ाचे सांगितले तेव्हा हे शेतकरी शांत बसले.
शेतकऱ्यांचा आक्षेप कशावर...
लाखोंच्या संख्येने शेतकरी आंदोलन करत असताना त्यांच्या बाजुने कोणताही अभिनेता उतरलेल नाही. कोणीही शेतकऱ्यांच्या हितावर काही बोललेले नाही. यामुळे शेतकऱ्यांनी पंजाबमध्ये कोणत्याही चित्रपटाचे शुटिंग होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. आता या पार्श्वभूमीवर सलमान खान येणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.