बॉलिवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी नुकतीच राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी प्रभू श्रीराम आणि सीता माता हे फक्त हिंदूंचे दैवत नाही असं विधान केलं. तसंच त्यांनी अनेक सामाजिक विषयांवर आपले विचार मांडले. दिवाळीच्या मुहुर्तावर जावेद अख्तर यांच्या वक्तव्याची चर्चा आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे दरवर्षी शिवाजी पार्क येथे दीपोत्सव कार्यक्रमाचं आयोजन करतात. काल या कार्यक्रमात जावेद अख्तर यांनी हजेरी लावली. तेव्हा ते म्हणाले,'रामायण भारतीय संस्कृतीचा वारसा आहे. सीतारामाच्या भूमीवर जन्माला आल्याचा आम्हाला गर्व आहे. प्रभू श्रीराम आणि सीता केवळ हिंदू देव देवता नाही. ही भारतीय संस्कृती आहे. मी नास्तिक आहे पण तरी मी प्रभू श्रीराम आणि सीतेला आपल्या देशाची संपत्ती मानतो म्हणूनच आज मी इथे आहे. जेव्हा आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो तेव्हा राम आणि सीताच आठवतात.जय सियाराम.'
तसंच जावेद अख्तर यांनी लखनऊतील आपल्या बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिला. ते म्हणाले,'तिथेही लोक एकमेकांना जय सियाराम म्हणत अभिवादन करतात. लहानपणी मी बघायचो की लखनऊमध्ये श्रीमंत लोक एकमेकांना गुड मॉर्निंग म्हणायचे पण रस्त्यावरुन येणारा जाणारा प्रत्येक जण जय सियाराम असंच बोलायचा. सियाराम हे प्रेम आणि एकतेचे प्रतीक आहेत. तुम्हीही माझ्यासोबत जय सियाराम चा जयघोष करा.'