बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय गीतकार जावेद अख्तर कायम त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. कोणताही संकोच न बाळगता जावेद अख्तर परखडपणे आपलं मत मांडत असतात. नुकतेच जावेद अख्तर यांनी हिंदू आणि मुस्लिमांकडून होणाऱ्या ट्रोलिंगवर आणि नास्तिकतेवर मोठं वक्तव्य केलं आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी ट्रोल करणाऱ्यावर संताप व्यक्त केला. तसेच आपण कोणत्याही धर्माला मानत नसून सर्व सण साजरे करतो असं सांगितलं.
जावेद अख्तर यांनी नुकतेच बरखा दत्तला मुलाखत दिली. यावेळी बरखा दत्त यांनी 'सोशल मीडियावर ट्रोल होणे सामान्य आहे का? स्वतःबद्दल ऐकलेली सर्वात मजेदार गोष्ट कोणती आहे? असे सवाल केले. यावर उत्तर देत जावेद अख्तर म्हणाले, "मी नास्तिक असतानाही, मला जिहादी म्हटलं जातं. मला तर अशा लोकांपासून वाचून राहण्यासाठी 3-4 वेळा पोलिस संरक्षण देण्यात आलं. हा मूर्खपणा आहे. लोकं सोशल मीडियावर कोणालाही शिवीगाळ करुन मजा घेतात. मिळणाऱ्या स्वातंत्र्याचा दुरउपयोग करतात'.
पुढे ते म्हणाले, 'मला तर हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही बाजूनं शिवीगाळ होतो. काही मुस्लिमांनी तर माझं नाव बदललं आहे. त्यांनी मला अमर नाव दिलं. हिंदू एक्सट्रीमिस्ट असे ते मला बोलतात. पाकिस्तानला जा. जेव्हा दोघांपैकी एक ट्रोल करणं थांबवतं. तेव्हा खर तर चिंता वाढते. जेव्हा दोन्ही बाजुचे लोक ट्रोल करतात तोपर्यंत सगळं ठीक आहे'.
'मी मुस्लिम नास्तिक आहे. धर्मावर विश्वास नाही. माझा जन्म मुस्लिम कुटुंबात झाला आहे. माझ्याकडे मुस्लिम होण्याशिवाय पर्याय नाही. कारण यासाठी मला माझा धर्म बदलावा लागेल. पण मी कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवत नाही मग मी त्यांच्यात का सामील होऊ? मी मुस्लिम धार्मिक श्रद्धा पाळत नाही. पण मुस्लिम असणं माझ्याशी जोडलं गेलं आह. अनेक लोक नास्तिक आहेत, पण समाजाच्या दबावामुळे ते स्वीकारू शकत नाहीत. त्यांची अवस्था 60 वर्षे जगलेल्या समलिंगी लोकांसारखी आहे. शबाना आणि मी सर्व सण साजरे करतो'.