‘शब्दांचे जादूगार’ जावेद अख्तर या नावाला कुठल्याही परिचयाची गरज नाही. केवळ शब्दांच्या जोरावर जावेद यांनी बॉलिवूडमध्ये एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली. शायर, कवी, गीतकार असलेल्या याच शब्दांच्या जादूगाराचा आज (17 जानेवारी) वाढदिवस.
जावेद अख्तर यांना ‘शब्दांचे जादूगार’ म्हटले जाते. पण फार कमी लोकांना ठाऊक असेल की त्यांचे खरे नावही जादू असेच आहे. यांचा जन्म 17 जानेवारी 1945 रोजी ग्वाल्हेर येथे झाला होता. त्यांचे वडील जाँ निसार अख्तर एक प्रख्यात उर्दू शायर आणि गीतकार होते. त्यामुळे जावेद अख्तर यांना कलेचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला.
1964 मध्ये जावेद अख्तर मुंबईत आले आणि मुंबईचेच झाले. याच मुंबईने जावेद अख्तर यांना ऐश्वर्य,प्रसिद्धी, ओळख असे सगळे काही मिळवून दिले. जावेद यांचे वडिलांसोबतचे नाते फारसे चांगले नव्हते. त्यामुळे वडिल एक प्रसिद्ध गीतकार असूनही जावेद अख्तर यांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची ओळख बनविण्यासाठी वडिलांची मदत घेतली नाही आणि म्हणूनच त्यांच्या यशाचा मार्ग अनेक संघर्षांनी भरलेला राहिला. अगदी रस्त्यावर झाडाखाली त्यांनी अनेक दिवस काढलेत. त्यानंतर कमाल अमरोही यांच्या स्टुडिओमध्ये त्यांच्या राहण्याची सोय झाली.
सलीम-जावेद या जोडीने अनेक अमर पटकथा लिहिल्या. सलीम खान आणि जावेद अख्तर यांची पहिली ओळख एस. एम. सागर यांच्या ‘सरहदी लुटेरा’ या चित्रपटाच्या चित्रिकरणाच्या वेळी झाली होती. आश्चर्य वाटेल पण त्यावेळी सलीम खान या चित्रपटात अभिनय करत होते. तर, जावेद अख्तर ‘क्लॅपर बॉय’चे काम करत होते. एक दिवस चित्रपटाचे संवाद लेखक सेटवर पोहोचले नाहीत आणि अचानक दिग्दर्शकाने ‘क्लॅपर बॉय’चे काम करणाºया जावेद अख्तर यांना चित्रपटातील संवाद लिहिण्यास सांगितले. एस. एम. सागर यांना जावेद अख्तर यांचे संवाद इतके आवडले की चित्रपटाच्या संवाद लेखनाची पुढची जबाबदारी थेट जावेद अख्तर यांच्यावर येऊन पडली. याच चित्रपटाच्या सेटवर जावेद अख्तर आणि सलीम खान यांची ओळख झाली. आणि बघता बघता सलीम- जावेद ही जोडी नावारुपास आली. या जोडीने आजवर 24 सुपरहिट सिनेमे दिलेत. जंजिर , दीवार , डॉन , सीता और गीता , शोले , मिस्टर इंडिया असे अनेक चित्रपट या यादीत आहेत.दोघांनी 1987 पर्यंत एकत्र काम केले. पण नंतर दोघांमध्ये मतभेद झाले आणि ही जोडी तुटली. मिस्टर इंडिया या जोडीचा शेवटचा चित्रपट होता.
शबानासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्री हनी इराणी यांच्यासोबत जावेद यांचे लग्न झाले होते. हनी आणि जावेद यांचा प्रेमविवाह होता. ‘सीता और गीता’ या चित्रपटाच्या सेटवर हनी आणि जावेद यांची ओळख झाली होती. काहीच दिवसांत त्यांच्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
पुढे जावेद यांच्या आयुष्यात शबाना आझमी आल्यात. जावेद शबानांच्या अब्बांना भेटायला येत. याचदरम्यान शबाना व जावेद यांची मैत्री झाली आणि पुढे प्रेम. 1984 मध्ये जावेद यांनी आपल्या पहिल्या पत्नीला ‘तलाक’ देत शबानांशी लग्न केले. जावेद आधीच विवाहित होते, याचदरम्यान जावेद आणि त्यांची पत्नी हनी यांच्यातील मतभेद वाढले. शेवटी ते दोघेही वेगळे झालेत आणि शबाना व जावेद यांनी लग्न केले. जावेद कायम मला सेन्स आॅफ सिक्युरिटी देतो. तो माझ्या अब्बासारखा आहे. मग ती शायरी असो किंवा राजकारण वा सामाजिक मुद्दा तो परखडपणे बोलतो, असे शबाना जावेद यांच्याबद्दल बोलल्या होत्या. जावेद यांचे लग्न झाले असल्यामुळे शबाना त्यांच्यापासून दूरच राहायची. पण एका पार्टीत शबानाच्या ‘स्पर्श’ या चित्रपटातील भूमिकेचे त्यांनी कौतुक केले आणि त्या दिवसापासून त्यांच्यात संभाषणाला सुरुवात झाली. काहीच काळात ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. हनी यांच्या कानावर ही गोष्ट पोहोचताच घरात रोज भांडणे व्हायला लागली. पण जावेद आता आपल्यावर प्रेम करत नाहीत याची हनी यांना जाणीव झाल्याने त्यांनी जावेद यांना शबानाकडे जायला सांगितले. लग्नाच्या सातच वर्षांत हनी आणि जावेद यांनी घटस्फोट घेतला. हनीसोबत घटस्फोट झाल्यानंतर वर्षभरातच जावेद आणि शबाना यांनी लग्न केले.