जावेद अख्तर हे बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध लेखक तसंच गीतकारही आहेत. त्यांचे चाहते देशातच नाही तर परदेशातही आहेत. जावेद अख्तर हे विविध विषयांवर आपली मतं मांडत असतात. आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे ते ओळखले जातात. आता जावेद अख्तर पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. जावेद अख्तर यांना लंडन SOAS विद्यापीठाने मानद डॉक्टरेटने सन्मानित केले आहे.
लंडनच्या SOAS विद्यापीठाच्या एका समारंभामध्ये जावेद अख्तर यांना मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी प्रदान करण्यात आली. जावेद अख्तर यांना लेखन क्षेत्रातील योगदान आणि एक कार्यकर्ता म्हणून सामाजिक न्यायासाठी केलेले समर्पण यासाठी सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात डॉ.अख्तर यांच्यासोबत त्यांची पत्नी अभिनेत्री शबाना आझमी आणि मुलगा फरहान अख्तर उपस्थित होते. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत जावेद अख्तर यांचे शबाना आझमींनी अभिनंदन केलं.
जावेद अख्तर यांना पद्मभूषण, साहित्य अकादमी पुरस्कार या पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. अंदाज, जंजीर, डॉन (1978), दिल चाहता है, दीवार,शोले, सागर (1985),सिलसिला, सीता और गीता या चित्रपटाच्या पटकथा जावेद अख्तर यांनी लिहिल्या आहेत. तर 'कल हो ना हो', 'वेक अप सिड', 'वीर-जारा' आणि 'लगान' यांसारख्या चित्रपटासाठी जावेद यांनी गाणी लिहीले आहे. जावेद अख्तर यांनी हिंदी सिनेमांना असे अजरामर संवाद दिले जे आजही कोणी विसरू शकलेलं नाही. पुढची अनेकवर्षही त्यांचे हे संवाद बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर राहतील यात काही शंका नाही.