Join us

"'ॲनिमल'सारखा सिनेमा सुपरहिट होणं धोकादायक", जावेद अख्तर स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2024 5:21 PM

रणबीर कपूरच्या "माझे बूट चाट"वरही मांडलं मत, म्हणाले, "जर सिनेमात एक पुरुष..."

२०२३च्या अखेरीस प्रदर्शित झालेल्या 'ॲनिमल' चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवलं. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाने बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडले. या सिनेमातील कलाकारांच्या कामाचंही प्रचंड कौतुक करण्यात आलं. 'ॲनिमल'मधील काही संवाद आणि सीन्समुळे या सिनेमावर टीकाही करण्यात आली होती. अनेक सेलिब्रिटींनीही या सिनेमाबाबत त्यांचं मत मांडलं होतं. आता प्रसिद्ध बॉलिवूड गीतकार जावेद अख्तर यांनी 'ॲनिमल'बाबत स्पष्ट शब्दांत मत मांडत या सिनेमावर टीका केली आहे. 

'ॲनिमल' सारखे सिनेमे हिट होणं हे धोकादायक आहे, असं मत जावेद अख्तर यांनी मांडलं आहे. अजिंठा फिल्म फेस्टिव्हलमध्ये बोलताना जावेद अख्तर यांनी रणबीरच्या 'ॲनिमल'मधील माझे बूट चाट या वादग्रस्त विधानावरही भाष्य केलं. ते म्हणाले, "जर सिनेमात एक पुरुष महिलेला माझे बूट चाट असं म्हणत असेल...एका महिलेला कानाखाली मारण्यात काय गैर आहे, असं दाखवणारा चित्रपट सुपरहिट होत असेल तर हे धोकादायक आहे." 'ॲनिमल'बरोबरच त्यांनी बॉलिवूडमधील गाण्यांवरही भाष्य केलं. 

ते म्हणाले, "लोक मला विचारतात की आजकाल कशी गाणी येत आहेत. गाणी तर ७-८ लोक एकत्र येऊन बनवत असतात. 'चोली के पिछे क्या है' हे गाणं एकाने लिहिलं. दोघांनी त्याला संगीत दिलं. दोघींनी त्यावर डान्स केला. एका कॅमेरामॅनने शूट केलं. हे ८-१० लोक प्रॉब्लेम नाहीत. समाजात हे गाणं सुपरहिट झालं होतं. कोटी लोकांना हे गाणं आवडलं होतं. याचीच मला भीती वाटते. सिनेमा बनवणाऱ्यांपेक्षा ते पाहणाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. कसे चित्रपट बनायला हवेत आणि कोणते नाहीत, हे तुम्ही ठरवायला हवं. आपल्या चित्रपटांत काय संस्कार असतील, काय दाखवलं जाईल आणि कोणता सिनेमा रिजेक्ट करायचा, हे तुम्हाला ठरवायचं आहे." 

संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित 'ॲनिमल' सिनेमात रणबीरसह रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. १ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने ८९६ कोटींचा बिझनेस केला आहे. 

टॅग्स :जावेद अख्तररणबीर कपूरसिनेमा