Join us

कंगना राणौतच्या अडचणीत वाढ, अभिनेत्रीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची जावेद अख्तर यांची न्यायालयाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2024 3:55 PM

कंगना राणौतविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे.

मंडी लोकसभा मतदारसंघातील खासदार कंगना राणौत आणि प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यात अनेक दिवसांपासून जोरदार वाद सुरू आहे. दोघांमधील परस्पर मतभेद सर्वश्रूत आहेत. यातच आता अभिनेत्रीविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची मागणी जावेद अख्तर यांनी न्यायालयाकडे केली आहे.  कंगना राणौत न्यायालयात गैरहजर राहिल्याप्रकरणी जावेद अख्तर यांनी हा अर्ज केला.

जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीची तारीख अनेक वेळा देण्यात आली आणि कोर्टाने अभिनेत्रीला वारंवार हजर राहण्याचे आदेशही दिले. मात्र कंगना एकदाही कोर्टात हजर राहिली नाही. गेल्या शनिवारी या प्रकरणाच्या सुनावणीसाठी कोर्टाने तारीख दिली होती, मात्र दरवेळेप्रमाणे कोर्टाच्या आदेशाची अवज्ञा करून कंगना हजर राहिली नाही. यानंतर जावेद अख्तरच्या वकिलाने २० जुलै रोजी न्यायालयात याचिका दाखल करून अभिनेत्रीविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्याची मागणी केली.

कंगना राणौतने न्यायालयात कायमस्वरूपी हजर राहण्यापासून सूट मागितली होती. पण, तिची मागणी फेटाळण्यात आली. अभिनेत्रीने न्यायालयीन कामकाजात विलंब करण्याचा प्रयत्न केला असून, अजामीनपात्र वॉरंट (NBW) जारी करण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचे जावेद अख्तर यांच्या वकिलाने म्हटले. मात्र, न्यायालयाने जावेद अख्तर यांनी मागणी केलेल्या अर्जाला स्थगिती देत, कंगना राणौतला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अभिनेत्रीच्या वकिलांद्वारे ती ९ सप्टेंबर २०२४ ला न्यायालयात हजर राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कंगना राणौत आणि जावेद अख्तर यांच्यातील हा वाद खूप वर्षांचा आहे. अभिनेत्रीने २०१६ मध्ये हृतिक रोशनवर अनेक आरोप केले होते. अभिनेत्रीच्या आरोपानुसार हृतिक रोशनने अभिनेत्रीसोबत गैरवर्तन केले होते. त्यानंतर, त्याने आपल्या एका मुलाखतीत दावा केला होता की जावेद अख्तरने त्याला आपल्या घरी बोलावले आणि अभिनेता हृतिक रोशनची माफी मागायला सांगितले.

गीतकाराने हे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आणि अभिनेत्रीवर मानहानीचा खटला दाखल केला.  यात काहीही तथ्य नसून नाहक आपली बदनामी केली जात असल्याचं जावेद अख्तर यांनी म्हटलं होतं. यावर  कंगना राणौतनेदेखील जावेद अख्तर यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. दिंडोशी कोर्टाने अख्तर यांच्या अर्जावर सुनावणी होईपर्यंत कंगनाच्या तक्रारीवरील आदेश आणि खटल्याच्या कार्यवाहीला स्थगिती दिली आहे.  सध्या सर्वत्र कंगना आणि जावेद अख्तर यांच्यातील वादाची चर्चा रंगली आहे.  आता याप्रकरणी ९ सप्टेंबर काय होतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टॅग्स :कंगना राणौतसेलिब्रिटीबॉलिवूडजावेद अख्तर