कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेन काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहेत. त्या निर्बंधानुसार शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र सरकारने ही नियमावली जाहीर केल्यानंतर सोशल मीडियावर याचे पडसाद उमटले आहेत. अनेकजण या नियमांसदर्भात सोशल मीडियावर काही ना काही शेअर करताना दिसत आहे. अभिनेता जावेद जाफरीने या संदर्भात एक मजेदार ट्वीट शेअर केले आहे.
वांद्रे येथे राहणाऱ्या जावेदने या ठिकाणी लावण्यात आलेला ‘बॅण्ड्रा टाइम्स’ अशा मथळ्याखालील एका सूचना फलकाचा फोटो शेअर केला असून या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नव्या निर्बंधानुसार अंत्यसंस्काराकरता २० जणांनाच उपस्थित राहण्यास परवानगी मिळणार आहे. तसेच दारुची दुकाने रात्री आठ वाजेपर्यंतच सुरु ठेवता येणार आहेत. अंत्यविधीला केवळ 20 आणि दारूच्या दुकानासमोर 2000 जणांना परवानगी या निर्बंधामागील लॉजिक या फोटोद्वारे समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे मजेशीर ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
जावेद जाफरीने शेअर केलेल्या फोटोत एक फलक दिसत असून ‘बॅण्ड्रा टाइम्स’ या बोर्डवर लिहिण्यात आलेले आहे की, अंत्यसंस्काराला केवळ २० लोकं उपस्थित राहू शकतात कारण तिथे आत्म्याने म्हणजेच स्पिरिटने शरीरचा त्याग केलेला असतो. मात्र दारुच्या दुकानासमोर २००० लोकं रांगेत उभे राहू शकतात कारण त्यांच्या शरीरामध्ये स्पिरीट जाणार असते.
जावेदचे हे ट्वीट वाचून नेटिझन्स त्यावर मजेदार कमेंट करताना दिसत आहेत.