सध्या जिकडेतिकडे शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाची चर्चा आहे. 'पठाण'नंतर किंग खानच्या 'जवान' चित्रपटासाठी चाहते आतुर आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. 'जवान'चा दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर किंग खानच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. गेल्या बऱ्याच दिवसापासून 'जवान'च्या प्रतिक्षेत असलेल्या शाहरुखच्या चाहत्यांची प्रतिक्षा आता संपली आहे. ७ सप्टेंबरला प्रदर्शित होणाऱ्या 'जवान' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात झाली आहे.
'रेड चिलीज एंटरटेनमेंट'कडून याबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. "तुमचा आणि आमची प्रतीक्षा संपली. जवानचं अॅडव्हान्स बुकिंग सुरू करण्यात आलं आहे. त्यामुळे आता तुम्ही जवानचं तिकीट खरेदी करू शकता," असं या पोस्टमध्ये म्हटलं गेलं आहे. शाहरुखच्या जवानच्या तिकिटांची किंमत हजारोंच्या घरात आहे.
'सुभेदार'ने गड राखला! पहिल्याच आठवड्यात बॉक्स ऑफिसवर कमावले 'इतके' कोटी
शाहरुख खानच्या 'जवान' चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगमधील तिकीट खरेदी करण्यासाठी चाहत्यांना हजारो रुपये मोजावे लागणार आहेत. जवानच्या अॅडव्हान्स बुकिंगमधील एका तिकिटाची किंमत तब्बल अडीच हजारांच्या घरात आहे. मुंबईत जवानचं एक तिकीट २ हजार ३०० तर दिल्लीत या तिकिटाची किंमत २ हजार ४०० रुपये इतकी आहे. तरीदेखील जवानची अर्धी तिकिटे विकली गेल्याची माहिती आहे.
अॅटली कुमार दिग्दर्शित 'जवान' चित्रपटात शाहरुख खानसह दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपती, नयनतारा, सान्या मल्होत्रा, दीपिका पदुकोण अशी कलाकारांची तगडी फौज आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी ७० कोटींची कमाई करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.