Join us

पहिल्याच दिवशी 'जवान' करणार १०० कोटींची कमाई? सनी देओलच्या 'गदर २'वर पडणार भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 1:46 PM

'जवान' प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

जवान (Jawan Movie) या बहुप्रतिक्षित बॉलिवूड अॅक्शन थ्रिलर रिलीज होण्यासाठी अगदीच काही दिवस असताना त्याचा उत्साह शिगेला पोहचला आहे. अरुण कुमार दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान, सान्या मल्होत्रा, नयनतारा आणि विजय सेतुपती यांच्यासोबत दुहेरी भूमिकेत आहेत. किंग खानचे चाहते ‘जवान’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.पठाण’नंतर शाहरुख ‘जवान’मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील अनेक रेकॉर्ड मोडणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

‘जवान’ चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगमधून सिनेमाची आत्तापर्यंत अनेक रेकॉर्ड मोडले होते. निर्माते आणि ट्रेड एनालिस्ट गिरीश जौहर यांच्या मते जवान पहिल्याच दिवशी जगभरातील बॉक्स ऑफिसवर १०० कोटींची कमाई करु शकतो.  

 गिरीश जौहर यांच्या मते जवान अगदी आरामात शाहरुख खानच्या पठाणचा भारतात रेकॉर्ड मोडू शकतो. पहिल्यादिवशी सर्व भाषांमध्ये हा सिनेमा ६० कोटी रुपयांची कमाई करु शकतो. त्याचबरोबर जगभरातील बॉक्स ऑफिसवर वीकेंडपर्यंत जवान ३५० ते ४०० कोटी रुपयांचा गल्ला जमावू शकतो. 

‘जवान’ चित्रपटाच्या अडव्हान्स बुकिंगमधून सिनेमाची आत्तापर्यंत तब्बल १० लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे शाहरुख प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी स्वत:च्याच ‘पठाण’ आणि सनी देओलच्या ‘गदर २’चा रेकॉर्ड मोडणार असल्याची शक्यता आहे.

शाहरुख खानच्या ‘पठाण’ने पहिल्या दिवशी ५७ कोटींची कमाई केली होती. तर सनी देओलच्या ‘गदर २’ने ४१ कोटींची कमाई केली होती. आता किंग खान पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धमाका करणार आहे. ‘जवान’ चित्रपटाच्या अडव्हान बुकिंगला मिळणारा प्रतिसाद पाहून हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी सुपरहिट ठरलेल्या ‘पठाण’ आणि ‘गदर २’ चा रेकॉर्ड मोडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 

टॅग्स :जवान चित्रपटशाहरुख खान