बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या ‘जवान’ने सिनेइंडस्ट्रीत धमाका केला आहे. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘जवान’ अखेर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला. ‘पठाण’नंतर शाहरुखच्या ‘जवान’ची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. ‘जवान’मधील शाहरुखचे लूक पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती. अनेक कारणांबरोबरच हा चित्रपट मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओकमुळेही चर्चेत होता. ‘जवान’च्या ट्रेलरमध्ये गिरीजाची झलक पाहिल्यानंतर प्रेक्षक थक्क झाले होते.
अनेक जाहिराती, चित्रपटांतून अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या गिरीजाने ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने जवानच्या शूटिंगचा अनुभव सांगितला. याबरोबरच तिने शाहरुख खानबरोबर काम करण्याबाबतही भाष्य केलं.या मुलाखतीत शूटिंगच्या पहिल्या दिवसाचा अनुभव सांगताना गिरीजा म्हणाली, “पुण्याच्या मेट्रो स्टेशनवर आमचं पहिल्या दिवसाचं शूटिंग झालं. खूप मोठा तामझाम होता. खूप ज्युनिअर्स, सिक्युरिटी, गर्दी पाहून पहिल्याच दिवशी कोणत्या लेव्हलच्या चित्रपटात आपण काम करतोय, याचा अनुभव आला. पण, माझ्यासाठी शूटिंगचा पहिला दिवस हा शाहरुखनला भेटले तेव्हा होतो.”
“पुण्यातून मुंबईला शूट करायला आलो तेव्हा सेटवर शाहरुख खानने चित्रपटातील सहा मुलींना मिठी मारली. आमचा हात धरुन या चित्रपटाचा भाग झाल्याबद्दल धन्यवाद असं तो म्हणाला. हे माझ्यासाठी खूपच अनपेक्षित होतं. तो क्षण मी विसरू शकत नाही. आपण सहकलाकारांना हॅलो वगैरे बोलून नॉर्मल शूटिंगला सुरुवात करतो. पण, शाहरुखने प्रत्येकीकडे येऊन तिचे आभार मानले,” असंही गिरीजा म्हणाली.
दरम्यान, ‘जवान’ चित्रपटात शाहरुख खानसह नयनतारा आणि विजय सेतुपथी यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात दीपिका पदुकोण पाहुणी कलाकार म्हणून झळकणार आहे. जवानमध्ये शाहरुखबरोबर इतर सहा अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिका साकारत आहेत. यातीलच एका भूमिकेत गिरीजा ओक दिसणार आहे.