बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) याचा जवान (jawan) हा सिनेमा सध्या सगळीकडे तुफान गाजत आहे. पहिल्या दिवसापासून या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तगडा गल्ला जमवला असून या सिनेमाविषयी अनेक नवनवीन अपडेट समोर येत आहेत. शाहरुख खान याची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमासाठी प्रथम दिग्दर्शकांनी एका साऊथ स्टारची निवड केली होती. परंतु, त्यानंतर किंग खान या सिनेमात झळकला. त्यामुळे शाहरुखच्या निवडीविषयी ही एकच चर्चा सगळीकडे रंगली आहे. याविषयी आता दिग्दर्शक अॅटली यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
'जवान'मध्ये शाहरुखपूर्वी अभिनेता विजय थलपती याची निवड करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, काही कारणास्तव विजयऐवजी शाहरुखला घेतलं गेलं, अशी चर्चा सध्या सगळीकडे होताना दिसते. यावर अॅटलीने स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. अलिकडेच अॅटलीने 'पिंकव्हिला'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने या सिनेमाविषयी अनेक खुलासे केले. यात जवानसाठी पहिली पसंती शाहरुख आणि साऊथ स्टार विजय थलपती यांच्यापैकी कोणाला होती हे त्याने सांगितलं.
नेमकं काय म्हणाला अॅटली?
"जवान हा सिनेमा फक्त शाहरुखसाठीच बनवला होता. माझ्या मनात दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. माझ्या मनात दुसरा कोणताही ऑप्शन नव्हता. पहिल्या दिवसापासून स्क्रिप्ट, सीन्समध्ये मी काय करणार, कसं करणार याविषय़ी मी विजय सरांशी बोलत होतो. ते माझ्या भावासारखे आहेत. आम्ही कायम आमच्या कामाविषयी सिरीअस असतो. ते कायम माझ्या पाठीशी असतात. त्यामुळे जवानविषयी आम्ही एकमेकांसोबत चर्चा केली. पण, माझी पहिली पसंती कायम शाहरुख खानलाच होती", असं अॅटली म्हणाला.
पुढे तो म्हणतो," जवानच्या ओटीटी व्हर्जनसाठी आमच्याकडे खास प्लॅन आहे. त्यामुळेच मी सध्या सुट्टीवर गेलो नाहीये. मी या एकाच गोष्टीवर सध्या काम करतोय. पण, तुमच्यासाठी नक्कीच काही तरी सरप्राइज असणार आहे."
दरम्यान, सनी देओलच्या 'गदर-2' नंतर आता शाहरुख खानचा 'जवान' चित्रपटही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. एका आठवड्यात 'जवान'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन 700 कोटींच्या आसपास पोहोचलं आहे.