आपल्या दमदार अभिनयामुळे बॉलिवूडचा एक काळ गाजवणारे कलाकार म्हणजे अभिनेता धर्मेंद्र (dharmendra) आणि अभिनेत्री जया बच्चन(Jaya bachchan). जवळपास ५२ वर्षानंतर ही जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर एकत्र येणार आहे. रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात ही जोडी स्क्रीन शेअर करणार आहे. यामध्येच सध्या जया बच्चन यांची एक जुनी मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी धर्मेंद्र यांच्यावर क्रश असल्याचं म्हटलं होतं. सध्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात ही जोडी एकत्र झळकणार असल्यामुळे त्यांचा हा जुना किस्सा चर्चेत आला आहे.
अलिकडेच एका मुलाखतीमध्ये धर्मेंद्र यांनी करण जोहरच्या सिनेमात जया आणि शबाना आझमी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. यापूर्वी ते गुड्डी आणि शोलेमध्ये जया बच्चनसोबत झळकले होते. त्यामुळे त्या काळी धर्मेंद्र आणि जया यांच्या नात्याची चर्चा रंगली होती. या जुन्या किस्स्यावर त्यांनी आता मौन सोडलं.
'जया बच्चन यांना तुम्ही आवडायचा हे खरे आहे का?'असं धर्मेंद्र यांना विचारण्यात आलं. त्यावर "जयाला माझ्याविषयी प्रेम आणि आदर आहे. मी, जया आणि अमिताभ बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. शोलेच्या शुटिंग दरम्यान तर आम्ही प्रचंड मज्जा केली होती, असं धर्मेंद्र म्हणाले. यामध्येच आता जया बच्चन यांनी २००७ साली करण जोहरच्या कॉफी विथ करणमध्ये दिलेली मुलाखत चर्चेत आली आहे.
"जेव्हा त्यांची आणि माझी पहिली भेट झाली होती त्यावेळी मी एका सोफ्याच्या मागे जाऊन लपून बसले होते. मी खूप घाबरले होते. काय करावं मला काहीच सुचत नव्हतं. कारण, त्यावेळी धर्मेंद्र खूपच देखणे होते. त्यावेळी त्यांनी पांढरा शर्ट आणि पांढरी पॅन्ट घातली होती हे अजूनही मला आठवतं तो त्यावेळी एखाद्या ग्रीक गॉडसारखाच दिसत होता, असं जया बच्चन म्हणाल्या होत्या.
दरम्यान, धर्मेंद्र आणि जया बच्चन यांनी ५२ वर्षांपूर्वी ऋषिकेश मुखर्जी यांच्या गुड्डी या सिनेमात एकत्र काम केलं. मात्र, आता रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या माध्यमातून ते एकत्र येणार आहेत. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट 28 जुलै रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.