बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्याकडे गडगंज संपत्ती आहे. सिनेमा, टेलिव्हिजन, क्रिकेट टीम, इतर व्यवसाय यामुळे त्यांची भरपूर कमाई होते. मात्र एक काळ असा होता जेव्हा बिग बी कर्जात बुडालेले होते. तेव्हा त्यांनी कोणाकडूनही मदत न घेता आपल्या कामातूनच कर्ज फेडले होते. धीरुभाई अंबानींनी त्यांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र बिग बींनी स्वत: पुन्हा उभा राहीन असा विश्वास दिला होता. यानंतर 'कौन बनेगा करोडपती' हा शो आला आणि अमिताभ बच्चन यांचं नशीबच पालटलं. त्या कठीण काळावर जया बच्चन (Jaya Bachchan) यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
नात नव्या नवेली नंदाच्या पॉडकास्टमध्ये जया बच्चन याविषयी व्यक्त झाल्या आहेत. त्या म्हणाल्या, "आम्ही आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यांवरुन पुढे गेलो आहे. अपयशही पाहिलं आहे. आम्ही दोघांनी मिळून त्या गोष्टी पार केल्या आहेत. मला माहित नाही मी चूक केलं की बरोबर पण जेव्हा एखादा पुरुष वाईट काळातून जात असतो तेव्हा त्याच्याबरोबर राहा. शांततेत त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहा. अशा परिस्थितीत चिडू नका यामुळे गोष्टी बिघडू शकतात. जर त्यांना तुमच्या मदतीची गरज असेल तर ते तुम्हाला विचारतीलच."
आईच्या या उत्तरावर श्वेता बच्चन नंदाने मात्र असहमती दर्शवली. ती म्हणाली, "मला तुझं म्हणणं पटलं नाही. मला वाटतं आपणही प्रॉब्लेम सॉल्व्हर असलो पाहिजे. तुम्हीही सक्रिय राहून उपाय काढले पाहिजेत. ना की शांततेत उभं राहिलं पाहिजे."
अमिताभ बच्चन यांची AB CORP ही कंपनी होती जी दिवाळखोरीत गेली होती. एकानंतर एक चित्रपट आपटले होते. त्यांच्यावर तब्बल 90 कोटींचं कर्ज होतं. यश चोप्रा यांचा 'मोहोब्बते' सिनेमा ऑफर झाला आणि त्यांनी हळूहळू कर्ज फेडलं. तेव्हाच कौन बनेगा करोडपतीही सुरु झाला. या शोने बिग बींचं करिअर पूर्वपातळीवर आलं. नंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. आज वयाच्या ८१ व्या वर्षीही ते अतिशय सक्रीय आहेत.