ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (jayant savarkar) यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली असून प्रत्येक जण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. यामध्ये काही सेलिब्रिटी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. सध्या त्यांची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी सिंघम आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याच्यासोबत काम करतानाचा आलेला अनुभव शेअर केला आहे.
मराठी कलाविश्वात अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या जयंत सावरकरांनी बॉलिवूडसिनेमांमध्येही काम केलं होतं. त्यातलाच एक सिनेमा म्हणजे रोहित शेट्टीचा सिंघम. एका मुलाखतीमध्ये जयंत सावरकर यांनी या सिनेमामध्ये त्यांना रोल कसा मिळाला, सेटवर त्यांना कशी वागणूक मिळाली यावर भाष्य केलं. सुलेखा तळवलकरच्या 'दिल के करीब' या कार्यक्रमात त्यांनी बरेच खुलासे केले.
"मला एक दिवस अतुल परचुरेचा फोन आला. म्हणाला, अशी अशी भूमिका आहे, रोहित शेट्टीचा सिनेमा आहे. काही कारणामुळे मला ती भूमिका करता येणार नाही. मग ती भूमिका मी स्वीकारली. पैसेही जास्तच सांगितले. थोडं कमी जास्त करुन आमचं सगळं ठरलं. कारण, तिथे काम करुन मला जितके पैसे मिळणार होते. तेवढे पैसे १० मराठी सिनेमा केल्यानंतरही मला मिळाले नसते. पण, रोहित शेट्टीविषयी एक सांगावंसं वाटतं. तो माणसू वेळेचा पक्का आहे. माझी शिफ्ट ९ची असेल तर त्याचा ड्रायव्हर मला ८ वाजता घ्यायला यायचा. तो आल्यानंतर १० मिनिटात मला जावं लागायचं. नाही तर तो तसाच निघून जायचा. खरंतर एखाद्या कलाकाराला याचा राग आला असता. पण, आपण एवढे मोठेही नाही आणि हिंदीमध्ये तर मुळीच नाही त्यामुळे राग यायचा प्रश्नच नव्हता", असं जयंत सावरकर म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "सेटवर गेल्यानंतर लगेच नाश्ता यायचा. मग त्यांचा मेकअप मॅन यायचा आणि आधी नाश्ता करणार की मेकअप असं विचारायचा. मी मेकअप आधी करुन घ्यायचो. कपडे,मेकअप सगळं झालं की मग नाश्ता करायचो. मी १५ दिवस तिकडे शूटला होता. त्यांनी माझअया राहण्याचा सगळा खर्च केला. इतकंच नाही तर मी तिकडे ३ दिवस रहायचो आणि मग घरी यायचो. या काळात तीनही वेळा माझ्या विमानाचा खर्च त्यांनीच केला. त्यांच्याकडे मराठी कलाकारांना आणि खासकरुन थिएटर ऑर्टिस्टना खूप मान दिला जातो."
दरम्यान, जयंत सावरकरांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टी हळहळली आहे. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली.