Prajakta Mali And Suresh Dhas Controversy : आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीविषयी (Prajakta Mali) केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकारण बरंच तापलं आहे. मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना धस यांनी बीडमधील एका सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख केला. परळीचा सांस्कृतिक पॅटर्न असे म्हणत आमदार धस यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं. यानंतर प्राजक्ता माळीने शनिवारी पत्रकार परिषद घेत आमदार सुरेश धस यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली. मात्र सुरेश धसांचा माफी मागायला नकार आहे. अशातच आता मराठी कलाविश्वातून संताप व्यक्त केला जात आहे. सोशल मीडियावरही प्राजक्ताच्या समर्थनार्थ अनेक कलाकारांनी पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं. अभिनेते जयवंत वाडकर यांनीही प्राजक्ता माळीला पाठिंबा दिला.
जयवंत वाडकर यांनी इन्स्टाग्रावर प्राजक्तासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. यावेळी फोटोसोबत रामदास फुटाणे यांची खास कविता शेअर केली. "फांदीवर घाव व्याकुळ मुळे धसमुसळ्यांच्या हाती प्राजक्ताची फुले", या शब्दात त्यांनी राजकारण्यांना चांगलेच सनावले. त्याच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत प्राजक्तासोबत असल्याचं म्हटलं आहे.
जयवंत वाडकर यांच्यासह महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी, नृत्यांगणा गौतमी पाटील, अभिनेता कुशल बद्रीके आणि राजकीय क्षेत्रातील काहींनी प्राजक्ताला पाठिंबा दिलाय. दरम्यान, सुरेश धस यांच्या वक्तव्यानंतर प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेतली आणि निवेदन दिले आहे. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राजक्ताला कारवाईबाबत आश्वस्त केले.
नेमकं काय म्हणाले होते सुरेश धस?
मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना धस म्हणाले होते की, "धनुभाऊंकडे गत पाच वर्षात एवढे पैसे कुठून आले? काय ते सांस्कृतिक कार्यक्रम. रश्मिका मंदाना, लय कंबर हलवते, ती सपना चौधरी, अलीकडे प्राजक्ता ताई माळीही परळीला यायला लागली आहे. ज्यांना कुणाला इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स करायचे असेल, त्यांनी परळीत यावं, येथून शिक्षण घ्यावं आणि देशभरात जाऊन त्याचा प्रचार प्रसार करावा".