Join us

नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील 'डॉन'नं जिंकलं फिल्मफेअर; नागपूरात अंकुशचं जंगी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 6:03 PM

फिल्मफेअर पुरस्कारवर आपलं नाव कोरल्यानंतर अंकुश पहिल्यांदाच घरी गेला. तेव्हा त्याचे नागपुरात चाहत्यांनी आणि मित्र मंडळींनी जंगी स्वागत केलं

चित्रपट क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कार समजला जाणारा फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता डेब्यूसाठी नागराज मंजुळेंच्या 'झुंड'मधील अभिनेता अंकुश गेडामला (Ankush Gedam) फिल्मफेअर मिळाला आहे. मराठी सिनेसृष्टीसाठीही ही नक्कीच अभिमानाची बाब आहे. फिल्मफेअर मिळाल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा ,कौतुकाचा वर्षाव होत आहे. अत्यंत सामान्य घरातला अंकुश सोशल मीडियावरही स्टार झाला आहे. 

फिल्मफेअर पुरस्कारवर आपलं नाव कोरल्यानंतर अंकुश पहिल्यांदाच घरी गेला. तेव्हा त्याचे नागपुरात चाहत्यांनी आणि मित्र मंडळींनी जंगी स्वागत केलं. मराठी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पहिलाच हिंदी सिनेमा 'झुंड' मधील मुख्य अभिनेता अंकुश गेडामने  डॉनची भूमिका साकारली होती. डॉनच्या भूमिकेत तो विशेष भाव खाऊन गेला होता. 

झुंडमध्ये अंकुशची निवड कशी झाली?'झुंड' सिनेमात अंकुश गेडामने मुख्य भूमिका साकारली आहे. त्याला सिनेमात 'डॉन' दाखवण्यात आले आहे. अंकुश  मुळचा नागपूरचा. त्याची सिनेमात निवड कशी झाली याची गोष्ट इंटरेस्टिंग आहे. अंकुशला अक्षरश: रस्त्यावर बघून निवडलं होतं. अंकुश शहरात गणपती विसर्जन मिरवणूकीत नाचत होता. तेव्हा नागराज यांचे भाऊ भूषण मंजुळे यांनी त्याला पाहिलं त्याचे फोटो, व्हिडिओ काढले. सिनेमातील सर्व कास्ट मिळाली होती पण डॉन भूमिकेसाठी कोणी मिळत नव्हतं. नागराज मंजुळे नागपूरमधून निघणारच होते. त्या दिवशी गणपती विसर्जन होतं. मिरवणूकीत नाचणाऱ्या अंकुशला पाहून त्याची थेट निवडच झाली. 

टॅग्स :फिल्मफेअर अवॉर्डनागराज मंजुळे