Jiah Khan Suicide Case: बॉलिवूड अभिनेत्री जिया खान 3 जून 2013 रोजी मुंबईतील तिच्या घरी मृतावस्थेत आढळून आली होती. अभिनेत्रीच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालयाने तब्बल 10 वर्षांनंतर निकाल दिला आहे. या प्रकरणात अभिनेता सूरज पांचोलीवर जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. आज निकाल देताना न्यायालयाने सांगितले की, सूरज पांचोलीची निर्दोष मुक्तता करण्यात आली. न्यायालयात निकालादरम्यान जिया खानची आई देखील उपस्थित होती.
न्यायालयाने निकाल सुनावण्यापूर्वी जियाची आई राबिया यांनीही त्यांच्या वकिलामार्फत आज अर्ज दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने राबिया खान यांच्या अर्जावर विचार केला नाही आणि निकाल देताना सूरज पांचोलीची जिया खानच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्त केलं. यापूर्वी या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिस करत होते आणि त्यानंतर दिवंगत अभिनेत्रीची आई राबिया खान यांच्या याचिकेवर न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले.
जियाचं करिअर जियाने २००७मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत‘नि:शब्द’ या सिनेमाद्वारे बॉलिवूड करिअरला सुरुवात केली. डेब्यूच्या वेळी जिया केवळ २१ वर्षांची होती. राम गोपाल वर्मा यांच्या या चित्रपटात जिया आणि अमिताभ यांच्यातील प्रेमसंबंध दाखवण्यात आले होते. जियाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. यानंतर जिया खान 2008 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'गजनी'मध्ये आमिर खानसोबत दिसली. आमिर खान आणि असिन स्टारर या चित्रपटात जिया एका मेडिकल स्टुडंटच्या भूमिकेत होती. यानंतर 2010 मध्ये जियाने तिसरा आणि शेवटचा चित्रपट 'हाऊसफुल' केला. या चित्रपटातही जियाने अक्षय कुमारसारख्या बड्या स्टार्ससोबत स्क्रीन शेअर केली होती आणि हा चित्रपटही हिट ठरला होता.