गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तिवरे धरण फुटलं. काल रात्री नऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यामध्ये 24 जण वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. सध्या घटनास्थळी एनडीआरएफच्या पथकाकडून मदतकार्य सुरू असून आतापर्यंत नऊ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. धरण फुटीमुळे भेंडेवाडी, तिवरे, आकले, कादवस, नांदिवसे, दादर, गानेखडपोली या गावांमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तर या धरणाला तडे गेल्याबाबत गावकऱ्यांनी तक्रार केली होती, अशी कबुली राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
तिवरे धरणाच्या या अपघातानंतर आता जितेंद्र जोशीने एक संतप्त सवाल ट्वीटरवरून केला आहे. त्याचा हा सवाल रास्त असल्याचे नेटिझन्सचे म्हणणे आहे. त्याने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, अवघ्या 20 वर्षापूर्वी बांधलेलं तिवरे धरण फुटतं? 9 जण मृत्युमुखी! 24 जण बेपत्ता... आसपासच्या गावकऱ्यांनी तक्रार करूनही याची दखल घेतली गेली नाही. हा वध आहे की खून? की दुर्लक्षिलेला मृत्यू!!
जितेंद्रच्या या ट्वीटवर अनेक रिप्लाय येत असून कुणावरही कारवाई होईल असे वाटत नाही. तसेच सर खरंच हा खून आहे अशा प्रतिक्रिया लोक देत आहेत.
२००० साली तिवरे या धरणाचं काम पूर्ण झालं होतं. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या धरणाच्या दुरूस्तीकडे कोणतंही लक्ष देण्यात आलेलं नव्हतं अशी तक्रार ग्रामस्थांनी अनेकवेळा केली आहे. इतकंच नाही तर तिवरे धरणाला गळती लागल्याचीही तक्रार ग्रामस्थांनी केली होती. धरणाच्याबाबत अनेक तक्रारी करण्यात आल्या असून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. या अपघातानंतर आता धरण फुटीप्रकरणी चौकशीचे आदेश गिरीश महाजन यांनी दिले आहेत.