Join us

जितेंद्र जोशीच्या या मराठी चित्रपटानं शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हलमध्ये मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 6:11 PM

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल(SCO) मध्ये तब्बल १४ चित्रपटांपैकी सर्वोत्तम चित्रपट म्हणून जितेंद्र जोशीच्या मराठी चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या सहकार्याने आयोजित शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन फिल्म फेस्टिव्हल(SCO) मध्ये तब्बल १४ चित्रपटांपैकी सर्वोत्तम चित्रपट म्हणून जिओ स्टुडिओजच्या मराठी चित्रपट गोदावरीची निवड करण्यात आली आहे. मुंबईमध्ये २७ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान मोठया दिमाख्यात पार पाडलेल्या या महोत्सवात भारतातील नामांकित सिनेमांची वर्णी लागली होती आणि त्यात गोदावरी या मराठी चित्रपटाला बेस्ट फिल्म म्हणून पुरस्कार मिळणे ही गौरवशाली बाब आहे.

प्रसून जोशी आणि श्री. आर माधवन यांच्या हस्ते गोदावरी चित्रपटाचे दिग्दर्शक निखिल महाजन आणि जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या गौरवशाली सोहळ्यात चित्रपटाचे नायक जितेंद्र जोशी, नायिका गौरी नलावडे आणि टीम उपस्थित होती.

चित्रपटाबद्दल सांगायचे तर गोदावरी ही निशिकांतची (जितेंद्र जोशी) कथा आहे, एक असा माणूस जो आपल्या कुटुंबापासून दूर भटकला आहे, अस्तित्वहीन आयुष्य जगतो आहे, आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नांची उत्तरं त्याला गोदावरी नदीजवळ मिळतात ज्याचा त्याने इतकी वर्षं तिरस्कार केला.

११ नोव्हेंबर २०२२ ला सिनेमागृहांमधे प्रदर्शित झाल्यानंतर अनेक फिल्म समीक्षक, मराठी सेलिब्रिटी आणि प्रेक्षक यांनी या सिनेमाचे प्रचंड कौतुक केले होते. तसेच या सिनेमाने प्रदर्शनाच्या आधीच परदेशातील अनेक महत्वाच्या चित्रपट महोत्सवात आपली मोहोर उमटवली होती.

टॅग्स :जितेंद्र जोशी