केरळमध्ये पावसाच्या थैमानामुळे आतापर्यंत ७२ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या केरळमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे राष्ट्रीय आपात्कालीन बचाव दलाच्या आणखी १२ टीमही येथे रवाना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे प्राण वाचविण्याचे प्रयत्न सुरु असून अभिनेता जॉन अब्राहम यानेही येथील नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांच्याशी राज्यातील पूरस्थितीबाबत चर्चा केली आहे. केंद्र सरकार केरळच्या जनतेच्या पाठिशी ठामपणे उभे असून कुठल्याही मदतीसाठी तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले आहे. त्यानंतर जॉन अब्राहमनेही लोकांना आवाहन करुन मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून या पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याचे आवाहन केले आहे.
‘केरळमध्ये सध्या जे काही सुरु आहे त्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तेथील नागरिकांवर ओढावलेले हे संकट पाहून मला प्रचंड त्रास होत आहे. केरळबरोबर माझ्या बालपणीच्या आठवणी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे माझी साऱ्यांना विनंती आहे की त्यांनी मुख्यमंत्री मदत निधीच्या माध्यमातून या पूरग्रस्त नागरिकांची मदत करावी, असे आवाहन जॉनने सोशल मीडियावर केले आहे.
केरळमधील लोकांच्या मदतीसाठी देशातील बरेच लोक पुढे सरसावले आहेत. त्यामुळे जॉनने केलेल्या या आवाहनामुळे आता बॉलिवूड सेलिब्रेटीही केरळच्या मदतीसाठी पुढाकार घेत आहेत.