सोशल मीडियावर कधी काय होईल, कधी कोण ट्रोल होईल, याचा नेम नाही. आता जॉन अब्राहम (John Abraham) याचंच बघा ना! जॉन अब्राहमनं असं काही ज्ञान पाजळलं की, सध्या तो सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होतोय. होय, जॉन असं काही बोलला की, अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला.काही दिवसांपूर्वी जॉन ‘सत्यमेव जयते 2’च्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये गेला होता. याठिकाणी जॉनने कपिलच्या विनंतीवरून फिटनेस व डाएटबद्दल अनेक टीप्स दिल्यात. वजन कमी करण्याचे काही उपाय त्यानं सांगितलं. शिवाय हार्ट अटॅक कशानं येतो? यावरही तो बोलला आणि नेमका इथंच घोळ झाला. ‘द कपिल शर्मा शो’मधील जॉनची 15 सेकंदाची एक क्लिप सध्या व्हायरल होतेय आणि ही क्लिप पाहून अनेक जण जॉनची खिल्ली उडवत आहेत. एकूणच क्लिपमधील जॉनची देहबोली, त्याचं बोलणं बघून नेटकरी सैराट झाले आहेत. मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी तर जॉनची जोरदार मजा घेतली आहे.
जॉन म्हणाला...तुम्ही तेलावर पाणी टाकल्यास पाण्याच्या वर बबल्स तयार होतात. अगदी तसंच तुम्ही तणावात असताना हृदयाजवळ बबल्स तयार होता. तुमचं रक्त, हृदयाकडे पंप होतं, ते त्या बबल्समुळे वर येऊन थांबतं. त्याला म्हणतात हार्ट अटॅक़..., असं या व्हिडीओ क्लिपमध्ये जॉन म्हणतोय. नेटक-यांनी घेतली मजा...जॉनच्या या क्लिपनंतर सोशल मीडियावर नेटकरी अक्षरश: ‘सैराट’ झाले आहेत. अनेकांनी जॉनची चांगलीच मजा घेतली आहे.‘अच्छा, म्हणून मी प्रत्येक समोसा खाल्ल्यानंतर बेशुद्ध होते,’असं अन्वी नावाच्या एका युजरने लिहिलं आहे. ‘बॉलिवूडने यालाही डंब बनवलं. आत्तापर्यंत हा सर्वात शिकलेला व हुशार अॅक्टर होता,’अशी कमेंट एका युजरने केली.
एका युझरने ‘वेलकम’ चित्रपटातला नाना पाटेकर यांचा फोटो शेअर करून ‘कंट्रोल उदय ...कंट्रोल!’ असं त्यावर लिहिलं आहे. आरआयपी मेडिकल सायन्स! अशी उपरोधिक कमेंट एका युझरने केली आहे. याआधी आयुष्यमान खुराणा हाही असाच ट्रोल झाला होता. प्रोटीन डायजेस्ट व्हायला 3 वर्षांचा काळ लागतो, असं आयुष्यमान म्हणाला होता. लोकांनी त्यावेळी त्याचीही अशीच खिल्ली उडवली होती.