बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम (John Abraham) हा आपल्याच कोशात वावरणारा अभिनेता. तो ना बॉलिवूडच्या पार्ट्यांत रमतो, ना अवार्ड फंक्शनमध्ये मिरवताना दिसतो. पण तूर्तास जॉन प्रचंड चर्चेत आहे. जॉनचा ‘अटॅक’ हा सिनेमा लवकरच रिलीज होतोय. सध्या जॉन या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याच सिनेमाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये असं काही झालं की, जॉनची सटकली. होय, पत्रकारांचे प्रश्न ऐकून जॉन इतका ‘इरिटेड’ झाला की, तो नको ते बोलून गेला.
‘अटॅक’च्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये एका पत्रकाराने जॉनला ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाबद्दल प्रश्न विचारला. पण जॉनने त्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं. यानंतर एका पत्रकाराने जॉनला त्याच्या चित्रपटातील ‘अनरिअलिस्टिक अॅक्शन’बद्दल प्रश्न विचारला. ‘तुझ्या सिनेमात अॅक्शनचा ओव्हरडोज होतो. चार-दोन गुंडांशी फाईट करणं हे ठीक आहे. पण एकाचवेळी 100-200 गुंडाशी लढणं हे जरा अति होतं. हाताने उचलून बाईक फेकणं, विमान रोखणं ही म्हणजे अतिशयोक्ती वाटते’, असं हा पत्रकार म्हणाला. मात्र तो बोलत असतानाच जॉनने त्याला मध्येच थांबवलं. तुम्ही माझ्या आगामी सिनेमाबद्दल बोलत आहात का? असं जॉनने त्याला विचारलं. यावर, नाही, मी तुझ्या सत्यमेव जयते या सिनेमाबद्दल बोलतोय, असं पत्रकार म्हणाला. यावर, ‘सॉरी पण मी इथे अटॅक या सिनेमाबद्दल बोलतोय. तुम्हाला काही अडचण असेल तर माफ करा’, असं जॉन खोचकपणे म्हणाला. तो पत्रकार पुन्हा अॅक्शनबद्दल बोलू लागल्यावर मात्र जॉनची सटकली. सॉरी..., असा एकच शब्द म्हणत त्याने त्या पत्रकारांना शांत केलं आणि मग आपल्या को-स्टार्सकडे बघत, ‘बिचारा हा (पत्रकार) जरा जास्तच फ्रस्ट्रेटेड दिसतोय,’ असं जॉन म्हणाला.
एका पत्रकार जॉनला त्याच्या फिटनेसबद्दल प्रश्न केला. यावर जॉनने भलतंच उत्तर दिलं. ‘ तुमच्या अशा मूर्ख प्रश्नांचं उत्तर द्यायचं म्हटल्यावर फिजिकली फिट होण्यापेक्षा मला मेंटली फिट व्हावं लागेल. सॉरी, पण डोकं घरी ठेवून आलात का?’असं तो म्हणाला. इतकंच नाही तर, ‘तुम्ही सर्व माझ्या येणा-या चित्रपटांबद्दल बोला. कारण आम्ही अटॅक या चित्रपटाचं प्रमोशन करत आहोत. पण तुम्ही त्याबद्दल विचारायचं सोडून द काश्मीर फाईल्स, अॅक्शन, बॉडी असले फालतू प्रश्न विचारत आहात. कृपा करून असा मूर्खपणा सोडा. तुम्ही असे अंकल टाईप प्रश्न विचारणार असाल तर प्रॉब्लेम होईल,’असंही तो म्हणाला.