एक काळ असा होता की, जॉन अब्राहम बॉलिवूडमधून जणू गायब झाला होता. पण अचानक जॉनचे नशीब फळफळले आणि त्याने जबरदस्त कमबॅक केले. ‘परमाणु’ या चित्रपटातील जॉनचा अॅक्शन अवतार चाहत्यांना भलताच आवडला. या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरही चांगली कमाई केली. ‘परमाणु’नंतर ‘सत्यमेव जयते’ हा जॉनचा नवा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. याशिवाय ‘रोमिओ अकबर वॉल्टर’ या चित्रपटातही जॉन गुप्तहेर बनून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. आता जॉनच्या चाहत्यांसाठी एक आणखी आनंदाची बातमी आहे. होय, जॉनच्या हाती नवा चित्रपट लागला आहे. या चित्रपटाचे नाव आहे, ‘बटला हाऊस’.
येत्या सप्टेंबरमध्ये या चित्रपटाचे शूटींग सुरू होत आहे. निखील अडवाणी दिग्दर्शित हा चित्रपट निखील अडवाणी, भूषण कुमार आणि स्वत: जॉन असे तिघे मिळून प्रोड्यूस करणार आहेत. १९ सप्टेंबर २००८ रोजी दिल्लीच्या जामिया नगरात इंडियन मुजाहिदीनच्या संदिग्ध अतिरेक्यांविरोधात मोहिम उघडण्यात आली होती. यात आतिफ अमीन व मोहम्मद साजिद या दोन अतिरेक्यांचा खात्मा झाला होता. दोन अन्य अतिरेकी पळण्यात यशस्वी झाले होते. तर एकाला जिवंत अटक करण्यात आली होती. ही चकमक बटला हाऊस एन्काऊंटर म्हणून ओळखली जाते. जॉनच्या चित्रपटाची कथा याच चकमकीवर आधारित असेल. दिल्ली, जयपूर, लखनौ, मुंबई शिवाय नेपाळमध्ये या चित्रपटाचे शूटींग होईल. निखीलने या चित्रपटासाठी सर्वांत आधी सैफ अली खानशी संपर्क साधला होता. सैफला चित्रपटाची स्क्रिप्टही आवडली होती. पण काही कारणास्तव सैफने त्यास नकार दिला आणि हा चित्रपट जॉनच्या झोळीत पडला.