बॉलिवूडचा हॅण्डसम हंक म्हणजेच अभिनेता जॉन अब्राहमने विविध भूमिका सक्षमपणे साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. नुकतेच त्याचे प्रदर्शित झालेले चित्रपट परमाणू : द स्टोरी ऑफ पोखरण आणि सत्यमेव जयते यांसारख्या चित्रपटातील जॉनच्या भूमिकेला खूप चांगली दाद मिळाली आहे. आता जॉनला खूप चांगल्या चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत. रेमो अकबर वॉल्टर आणि बाटला हाऊस सारखे चित्रपट त्याच्या हातात आहेत. आणखीन एक चित्रपट नुकताच त्याने साइन केला आहे. जो त्याचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच १९११ साली घडलेल्या एका ऐतिहासिक घटनेवर आधारीत हा चित्रपट आहे. १९११ साली आशियाई फुटबॉल टीमने आईएफए शिल्ड सामना जिंकला होता. तेव्हा मोहन बागान आशियाई फुटबॉल टीमचे कर्णधार होते. हीच ऐतिहासिक घटना रुपेरी पडद्यावर अनुभवायला मिळणार आहे. यात जॉन कर्णधार मोहन बागान यांच्या भूमिकेत दिसणार आहे. जॉन फुटबॉल प्रेमी असल्यामुळे तो आतापासूनच आपल्या भूमिकेच्या तयारीला लागला आहे. निखिल आडवाणी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. त्यांनी ट्विटर अकाउंटवरून नुकतीच चित्रपटाची अधिकृत घोषणा केली आहे. निखिल आडवाणीने ट्विट केले की, जॉन अब्राहमने मला १९११ची जबाबदारी दिली असून माझ्यासाठी हा सन्मान आहे. प्रत्यक्षात आपल्या देशातील ही ऐतिहासिक घटना असून ही एक प्रेरणादायी कथा आहे.
या निखिल आडवाणीच्या ट्विटला जॉनने प्रतिक्रिया दिली की, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. जॉनला मोहन बागान यांच्या भूमिकेत रुपेरी पडद्यावर पाहणे कमालीचे ठरणार आहे.