जॉनी लिव्हरचा आज म्हणजेच १४ ऑगस्टला वाढदिवस असून त्याच्याविषयी आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत. जॉनी लिव्हरने आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. जॉनी एक स्टार असला तरी तो त्याच्या खाजगी आयुष्याविषयी बोलणे नेहमीच टाळतो.
जॉनी लिव्हरची मुलगी जीमीने त्याच्या पावलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये एंट्री केली आहे तर त्याचा मुलगा जेसीने देखील काही कॉमेडी शो केले असून तो लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करेल असे म्हटले जात आहे.
जॉनीला अनेकवेळा त्याच्या मुलांसोबत पाहायला मिळते. त्याच्या मुलीसोबत तर त्याने अनेक कार्यक्रमात देखील हजेरी लावली आहे. पण जॉनी लिव्हरची पत्नी खूपच कमी वेळा कोणत्याही खाजगी समारंभात हजेरी लावत असल्याचे दिसून येते. जॉनीच्या पत्नीचे नाव सुजाता असून त्याच्या आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात ती तिच्या पाठिशी उभी राहिली आहे.
जॉनी आणि त्याच्या पत्नीने काही वर्षांपूर्वी एका मोठ्या संकटाला तोंड दिले होते. त्यानेच एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. त्यांचा मुलगा जेसी दहा वर्षांचा असताना त्याला ट्युमर झाला होता. त्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त झाले होते.
जॉनी प्रचंड टेन्शनमध्ये असल्याने त्याने चित्रपटांमध्ये काम करणे सोडले. तो वर्षातून एखादा चित्रपट आणि एखादा शो करत होता. जेसीवर उपचार सुरू असले तरी त्याचा ट्युमर दिवसेंदिवस वाढतच चालला होता.
जेसीच्या मानेवरच ट्युमर होता. त्यामुळे कॉलरने तो लपवून तो शाळेत जायचा. पण त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचत चालला होता. ट्युमरचे ऑपरेशन केल्यास त्याचा जीवही जाऊ शकतो असे डॉक्टरांनी सांगितले असल्याने त्यांनी ऑपरेशनचा विचार सोडून दिला होता. पण न्यू जर्सीतील एका डॉक्टरांकडे ते त्याला २००२ मध्ये घेऊन गेले. तेथील डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला. पण काहीही केल्या जॉनीची पत्नी त्यासाठी तयार नव्हती. पण त्याने कसेबसे तिला ऑपरेशनसाठी तयार केले आणि केवळ तीन तासात त्यांचे संपूर्ण आयुष्य बदलले. कारण हे ऑपरेशन यशस्वी झाले होते.