बॉलिवूड अभिनेता आणि फिल्ममेकर ज्युनिअर महम्मूद (Junior mehmood) यांच्या प्रकृतीविषयी एक मोठी माहिती समोर आली आहे. महम्मूद यांना पोटाचा कॅन्सर झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. इतकंच नाही तर त्याचा रक्तदाब आणि साखरेची पातळी वाढल्यामुळे त्यांचं २० किलो वजन कमी झालं आहे. अशी माहिती, त्यांचा भाऊ सलाम काजी यांनी ई टाइम्सला दिली आहे.
ज्युनिअर महम्मूद यांना स्टेज ४ चा कॅन्सर झाला असून नोव्हेंबरमध्ये त्यांच्या कर्करोगाचं निदान झालं. कॅर्करोग चौथ्या स्टेजला पोहोचल्यामुळे त्यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. इतकंच नाही तर डॉक्टरांच्या मतानुसार, त्यांच्याकडे अखेरचे ४० दिवस राहिले आहेत. त्यामुळेच अभिनेता जॉनी लिव्हर यांनी त्यांची भेट घेत मदतीचा हात पुढे केला आहे.
सध्या सोशल मीडियावर जॉनी लिव्हर आणि ज्युनिअर महम्मूद यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जॉनी लिव्हर यांनी महम्मूद यांची भेट घेतली. विशेष म्हणजे यावेळी महम्मूद यांची अत्यंत खालावल्याचं दिसून येत आहे. इतकंच नाही तर त्यांना ओळखणंही कठीण झालं आहे.
महम्मूद यांनी नोव्हेंबर २०२३ मध्ये पोटाचा कर्करोग असल्याचं निदान झालं. मात्र, तोपर्यंत त्यांचा कर्करोग स्टेज ४पर्यंत पोहोचला. या कर्करोगामुळे त्यांच्या फुफ्फुसं आणि अन्य अवयवांवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. डॉक्टरांच्या मते, त्यांच्याकडे केवळ अखेरचे ४० दिवस शिल्लक आहेत. परंतु, पोटातील कर्करोगाची गाठ काढल्यानंतर त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणादेखील होऊ शकते असंही त्यांचं म्हणणं आहे. या गोष्टीची माहिती मिळताच जॉनी लिव्हर महम्मूद यांच्या भेटीला आले. इंडस्ट्रीतून महम्मूद यांची भेट घेणारे जॉनी लिव्हर पहिला व्यक्ती असल्याचं सलाम काजी यांनी सांगितलं.
दरम्यान, महम्मूद यांची मुलं सध्या त्यांची काळजी घेत आहेत. त्यांना कोणतीही आर्थिक समस्या नाही मात्र तरीदेखील जॉनी लिव्हर यांनी त्यांना काही पैसे मदतीच्या स्वरुपात दिले आहेत. इतकंच नाही तर कधीही मदत लागली तर एक फोन करा मी लगेच येईन असंही जॉनी लिव्हर यांनी सांगितलं आहे.
https://www.lokmat.com/elections/