अभिनेते जॉनी वॉकर यांनी लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांचा खट्याळ चेहरा पडद्यावर दिसताच प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलायचे. जॉनी वॉकर यांना पाहून ते एक नंबरचे दारूडे असतील, असेच सगळ्यांना वाटायचे. पण खऱ्या आयुष्यात जॉनी वॉकर यांनी दारूला कधी हातही लावला नाही. जॉनी वॉकर यांचा आज वाढदिवस असून त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1926 ला इंदौरमध्ये झाला. जॉनी वॉकर अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी बस कंडक्टर होते हे तुम्हाला माहीत आहे का? हो, हे खरे आहे... अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी ते अनेक वर्षं कंडक्टर म्हणून काम करत होते.
जॉनी वॉकर बॉम्बे इलेक्ट्रीक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टच्या बस सर्विसमध्ये अनेक वर्षं काम करत होते. याच दरम्यान बलराज सहानी यांनी त्यांना पाहिले. जॉनी कंडक्टर असताना लोकांचे प्रचंड मनोरंजन करायचे. त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर खूपच चांगला होता. हे सगळे बलराज सहानी यांनी पाहिले आणि त्यांची भेट गुरू दत्त यांच्याशी करून दिली. त्यावेळी गुरू दत्त बाजी या चित्रपटावर काम करत होते. पहिल्याच भेटीत गुरू दत्त यांना जॉनी वॉकर प्रचंड आवडले आणि त्यांना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्यांची पहिल्याच चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही.
जॉनी वॉकर यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल सर जो तेरा चकराये... हे गाणे त्याकाळात प्रचंड गाजले होते. आज या गाण्याला अनेक वर्षं झाले असले तरी या गाण्याची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही.
जॉनी वॉकर यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले असून त्यांना त्यांच्या अभिनयासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आले आहे. त्यांना मधुमती या त्यांच्या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. तसेच त्यांना शिखर या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी टॅक्सी ड्रायव्हर, देवदास, सीआयडी, नया दौर, कागज के फूल, दो रास्त आणि आनंद यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 1997 ला त्यांनी चाची ४२० या चित्रपटात काम केले होते. त्यांचे 29 जुलै 2003 ला मुंबईत निधन झाले.