- सुधीर गाडगीळ, ख्यातनाम लेखक, संवादक
सुपरस्टार राजेश खन्ना यांना अगदी जवळून अनुभवायची संधी मला मिळाली, ती एका ज्येष्ठ पत्रकार सहकारी मैत्रिणीमुळे! तिचं नाव देवयानी चौबळ. फिल्म इंडस्ट्रीत तिला ‘देवी’ संबोधत. ‘देवी’ पत्रकारांमधील स्टार होती. मी त्याकाळी ‘मनोहर’ साप्ताहिकात सिनेमावर लिहीत असे. आमच्याकडे ‘चंदेरी च्युइंगम’ या नावाचा सिनेमाचा स्तंभ ती लिहायला लागल्याने आमची ओळख झाली. तिच्यामुळे सुपरस्टार्सच्या घरी जायची संधी मला मिळत गेली.‘आराधना’, ‘सच्चा झूठा’च्या प्रीमिअर शोंना हजर राहता आलं. ही संधी मराठी पत्रकारांना फारशी मिळत नसे. या सुपरस्टारचा टॉपचा काळ आणि लवकरच हिंदी चित्रसृष्टी पादाक्रांत करून सुपरहिट ठरलेल्या अमिताभ बच्चनचा आरंभकाळ यांचा मी साक्षी ठरलो. एवढंच नव्हे तर अमिताभ हा राजेश खन्नाची छुट्टी करील, असं भविष्य वर्तवणाऱ्या देवीच्या वक्तव्याचाही मी साक्षी ठरलो. या सीमारेषेवरचा चित्रपट ‘आनंद,’ ‘बाबू मोशॉय’, जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नहीं’ म्हणणारा राजेश खन्ना. ‘आनंद’चा मुंबईत ‘ब्लेझ’मध्ये झालेला प्रेस शो. तो शो संपत असताना देवी मला म्हणाली, ‘शोनंतरच्या पार्टीला जाऊ नको. मी सांगते त्या मर्सिडीजमध्ये जाऊन बस.’ मी बसलो. काही क्षणांत दस्तुरखुद्द राजेश खन्ना त्याच गाडीत माझ्या शेजारी येऊन बसला. आमची ओळख नव्हती. ‘मी कोण?’ अशा अर्थाचा लुक त्यानं दिल्यावर मी त्याला म्हटले. ‘देवी, टोल्ड मी टू सीट हिअर.’ काही क्षणानं देवी येऊन पुढच्या सीटवर बसली. ‘आनंद’ सिनेमा पाहून काही मिनिटेच झालेली. गाडी सुरू झाली तशी देवी मागे वळून राजेश खन्नाला थेट म्हणाली, ‘काका, इस लंबू के साथ (अमिताभ) फिर काम मत करना, ये तुम्हारी छुट्टी कर देगा.’ यावर राजेश फस्सकन हसला आणि आपल्या सुपरस्टारपदाच्या गुर्मीत, ‘ये पतला, काला लंबू (म्हणजे अमिताभ) मेरी छुट्टी कर देगा? क्या बात करती हो देवी?’ यावर ‘देवी’ ठामपणे म्हणाली, ‘उसकी ऑंखें और उसकी आवाज तुम्हारी छुट्टी कर देगी !’ - देवीच्या या भविष्यवाणीचा मी साक्षी आहे आणि तसंच घडलं. अमिताभ आपल्या शब्दफेकीच्या नि आवाजाच्या जोरावर सुपरस्टार झाला आणि राजेश खन्नाची लोकप्रियता ओसरत गेली. एका स्टारकडून दुसऱ्या स्टारकडे सुपरस्टार पद जाण्याचा आणि ते भविष्य वर्तवणाऱ्या ‘देवी’च्या वाणीचा मी साक्षी आहे.