Jr NTR : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा 20 वर्षे जुना सुपरहिट चित्रपट 'सिम्हाद्री' सध्या चर्चेत आहे. ज्युनिअर एनटीआरच्या वाढदिवसानिमित्त हा चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, 20 वर्षांनंतरही प्रेक्षकांमध्ये 'सिम्हाद्री'ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. री-रिलीज होऊनही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे.
'सिम्हाद्री' चित्रपटाने रिलीजच्या पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर पाच कोटींचा गल्ला जमवला आहे. Jr NTR स्टारर 'सिम्हाद्री' हा 2003 चा SS राजामौली दिग्दर्शित चित्रपट आहे. हा चित्रपट त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणारा तेलुगु चित्रपट होता. बाहुबली आणि आरआरआरचे लेखक व्ही विजयेंद्र प्रसाद यांनी हा चित्रपट लिहिला होता. ज्युनियर एनटीआरसोबत भूमिका चावला, अंकिता, मुकेश ऋषी आणि राहुल देवही 'सिम्हाद्री' चित्रपटात आहेत. हा चित्रपट यूट्यूबवर हिंदी डबमध्येही उपलब्ध आहे.
थिएटरमध्ये फटाके फोडले
Jr NTR ची देशभरात तगडी फॅन फॉलोइंग आहे. एनटीआरचा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये एक वेगळीच क्रेझ असते. पण, कधीकधी याच क्रेझमुळे नको ती घटना घडू शकते. 20 मे रोजी वाढदिवसानिमित्त 'सिम्हाद्री' प्रदर्शित करण्यात आला होता. शनिवारी विजयवाडा येथील एका थिएटरमध्ये त्याचा 'सिम्हाद्री' चित्रपट सुरू होता, यावेळी चाहत्यांनी फटाके फोडून आपल्या आवडत्या अभिनेत्याचा वाढदिवस सिनेमागृहात साजरा. यामुळे सिनेमा हॉलमध्ये आग लागली. या दुर्घटनेत हॉलमधील काही सीटचे नुकसान झाले आहे. या घटनेशी संबंधित एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.