ऑनलाइन लोकमत
थिरुअनंतपुरम, दि. 11 - सहअभिनेत्रीचं अपहरण आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला मल्याळम अभिनेता दिलीप याला 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पीटीआय वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे.
अभिनेता दिलीप याला मंगळवारी सकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी हजर करण्यात आलं होतं. सगळ्या बाबींची पूर्तता केल्यानंतर दंडाधिकाऱ्यांनी दिलीप त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सुनावणीनंतर अलूवामधील कारागृहात दिलीप यांची रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणाची दंडाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सुनावणी झाली त्यावेळी घराबाहेर स्थानिक नागरीकांची मोठी गर्दी झाली होती. तसंच अभिनेता दिलीप याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मल्याळम अभिनेता दिलीप याला भा.द. वि कलम 120(ब) नुसार शिक्षा सुनाविण्यात आली आहे. त्याचा जामीन अर्ज कोर्टात सादर करण्यात आला आहे, अशी माहिती वकील के. राजकुमार यांनी दिली आहे. बुधवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
अभिनेता दिलीप याला कुठल्याही प्रकारची विशेष सुविधा देण्याची सूचना दंडाधिकाऱ्यांनी दिली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
काय आहे प्रकरण?
मल्याळम अभिनेता दिलीप याला सहअभिनेत्रीचं अपहरण आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली सोमवारी पोलिसांनी अटक केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, याप्रकरणी गेल्या दोन आठवड्यापूर्वी पोलिसांनी दिलीप आणि दिग्दर्शक नादिर शहा यांची 12 तास चौकशी केली होती. त्यानंतर दिलीप याची पत्नी काव्या माधवन हिच्या व्यावसायिक ठिकाणांवर छापे टाकले होते. सोमवारी मदुराईमध्ये शूटिंगच्या दरम्यान दिलीप याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर संध्याकाळी दिलीप याला अटक करण्यात आली.
अमरनाथ यात्रा हल्ल्याबाबत अक्षय कुमारनं व्यक्त केला संताप
गुजरात शिक्षण मंडळाचा नवा पराक्रम, पुस्तकात "रोजा"चा उल्लेख संसर्गजन्य आजार
पोलिसांच्या माहितीनुसार, सहअभिनेत्रीचे अपहरण आणि विनयभंग करण्याचे षडयंत्र रचण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरु होतं. 19 फेब्रुवारीला रात्रीच्या सुमारास कोच्चीजवळ अभिनेत्रीवर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी एप्रिल महिन्यात सुपारी गॅंगविरोधात चार्जशीट दाखल केली होती.
गेल्या महिन्यात कथित गॅंगकडून सुनील कुमार ऊर्फ पल्सर सनी याच्याद्वारे एक पत्र समोर आलं होतं. या पत्रात सुनील कुमारने दिलीप याच्याकडे 1.5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. यावर दिलीपने सुनील कुमारच्याविरोधात ब्लॅकमेल आणि खंडणीची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरु केला होता.
दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणात दिलीप याचाच हात असल्याचं स्पष्ट करत त्याला अटक केली.