जुही चावलाने 'कयामत से कयामत तक', 'हम है राही प्यार कै', 'डर' आदी बॉलीवूड चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. १९८४ साली मिस इंडिया हा किताब जिंकल्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने तिच्या विनोदी टायमिंगने आणि वैविध्यपूर्ण ऑनस्क्रीन व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांना थक्क करून टाकले. जुहीच्या चेहऱ्यावर आपल्याला नेहमीच एक सुंदर हास्य पाहायला मिळते. पण या हास्यामागे एक दुःख लपलेले आहे. जुहीच्या आयुष्यातील सगळ्यात जवळच्या व्यक्तीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. जुही आजही त्या दुःखातून बाहेर पडलेली नाहीये. तिनेच ही गोष्ट अनेक मुलाखतींमध्ये सांगितली आहे.
जुही सध्या चित्रपटांमध्ये खूपच कमी दिसते. तिने नुकत्याच बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत तिच्या खाजगी जीवनाविषयी तिने अनेक गोष्टी सांगितल्या. तिच्या भावाच्या निधनाला अनेक वर्षं झाले असले तरी ती आजही या दुःखातून सावरलेली नसल्याचे देखील तिने या मुलाखतीत कबूल केले. जुहीच्या भावाचे नाव बॉबी चावला होते. तो शाहरुख खानचा खूप जवळचा मित्र होता. त्याच्या रेड चिलीजमध्ये तो सीईओ होता. पण 2010 मध्ये झालेल्या एका अपघातात तो कोमामध्ये गेला आणि त्यानंतर चार वर्षांनी म्हणजेच 2014 मध्ये त्याचे निधन झाले. बॉबी जुहीपेक्षा आठ वर्षांनी मोठा होता. आई-वडिलांच्या निधनानंतर तिचा भाऊ हा तिच्यासाठी सर्वस्वी होता.
जुही सांगते, मी अतिशय विनम्र का आहे असे मला अनेकजण विचारतात. त्यावर मी एकच उत्तर देते की, मी अतिशय चांगला आणि वाईट असे दोन्ही काळ पाहिले आहेत. या मुलाखतीत भावाचा विषय निघाल्यानंतर जुहीला तिचे अश्रू आवरत नव्हते.
जुही चावलाला नव्वदीच्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानले जात असे. तिने तिच्या कारकिर्दीत खूप चांगल्या भूमिका साकारल्या असून या भूमिकांसाठी तिला पुरस्कार देखील मिळाले आहेत. जुही आज तिच्या कुटुंबाला जास्त वेळ देत असल्याने खूपच कमी चित्रपटांमध्ये काम करताना दिसते. ती आयपीएलच्या कोलकाता टीमची मालकीण देखील आहे.