देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होणारा सण दिवाळी म्हणजे दीपोत्सव. मात्र, आजही समाजातील अनेक घटक असे आहेत. ज्यांच्या आयुष्यात वर्षभर अंधारच असतो. त्यांच्या आयुष्यातही सुखाचा प्रकाश यावा म्हणून 'ठरलं तर मग' फेम जुई गडकरी गेल्या काही वर्षांपासून शांतीवन आश्रमातील निराधार आजीआजोबा आणि कुष्ठरोगाने त्रस्त असणारे काही पेशंट यांच्यासोबत दिवाळी साजरे करते. यंदाचं तिच एकोणीसावं वर्ष आहे. आश्रमातील लोकांची दिवाळी गोड करण्यासाठी तिनं चाहत्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केलं आहे.
जुईने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती म्हणते, 'माझी दरवर्षीची दिवाळी मी पनवेलमधील शांतीवन आश्रमातून सुरु करते. माझ्या मैत्रिणीसोबत मी तिथे जाते. यंदाचं माझ एकोणीसावं वर्ष आहे. आम्ही त्या आश्रमात जातो. तिथे कुष्ठरोगाने त्रस्त असणारे काही पेशंट आहेत. निराधार आजीआजोबा आहेत. आम्ही आख्खा आश्रम सजवतो, रांगोळ्या काढतो. त्यांच्यासोबतच तिथे जेवतो आणि तिथे छान गाण्याचे-नाचाचे कार्यक्रमही होतात'.
पुढे जुई म्हणते, 'तिथे आम्ही छानशी देणगीही देतो. जेणेकरुन तिथल्या लहान मुलांना, आजीआजोबांना, पेशंटना त्या पैशांचा उपयोग करता येईल. जमेल तसे पैसे जमा करुन आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. अमुकतमुक पैसे द्यायलाच हवेत असा काही आग्रह नसतो. गेले अनेक वर्ष फेसबुक-इन्स्टाग्रामवरुन काही लोक आम्हाला देणगीसाठी हातभार लावत आहेत. तर यंदाही कुणाला मदत करायची असेल तर मेसेज करावा. मग मी तुम्हाला बँक तपशील शेअर करेल. आणि हो माझ्यावर विश्वास ठेवा तुमचे पैशांचा गैरवापर नाही. एका चांगल्या कामासाठी त्याचा उपयोग होईल. यामागे आमचा हेतू एवढाच आहे की आपण समाजाचे देणे लागतो. त्यामुळे एक दिवस त्यांना द्यायला काहीच हरकत नाही'.
चेहऱ्यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणे हाच दिवाळीचा आनंद असल्याचे तिनं म्हटलं. जुईच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केलाय. 'खरचं खूप छान काम करताय तुम्ही. जगात माणुसकी शिल्लक आहे. आपुलकी आहे', असे एका युजरने म्हटलं.
जुई गडकरी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री असुन तिने आजवर पुढचं पाऊल, वर्तुळ अशा मराठी मालिकांमध्ये अभिनय केलाय. याशिवाय जुई बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होती. सध्या जुईची ठरलं तर मग मालिका लोकप्रिय झाली आहे. जुई गडकरी मालिकेत साकारत असलेली सायलीची भुमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेमुळे जुईच्या फॅन फॉलोईंगमध्येही वाढ झाली आहे.
.