बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आजवर अनेक सुपरहिट सिनेमांमधून प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन केलं आहे. पण, आता आमिर अभिनयाला रामराम करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आमिरचा लेक जुनेदने केलेल्या एका वक्तव्यामुळे या चर्चा रंगल्या आहेत. जुनैद सध्या महाराज या त्याच्या सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुकही होत आहे.
'महाराज' सिनेमाच्या सक्सेसनंतर आमिरने आमिर खान प्रोडक्शनची जबाबदारी लेकाकडे सोपवली आहे. त्यामुळेच अभिनेता अभिनयातून संन्यास घेणार का? अशा चर्चा रंगली आहे. जुनैदने 'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना दिलेल्या हिंटमुळे याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. जुनैद म्हणाला, "पीके सिनेमाच्या सेटवर मी कॅमेराच्या मागे होतो. अनेक जाहिरातींच्या शूटिंगमध्येही मी मदत केली आहे. महाराज सिनेमाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी आमिर खान प्रोडक्शनच्या एका सिनेमात काम करत होतो. तेव्हा किरण राव लापता लेडीज सिनेमावर काम करत होती. आणि वडील म्हणाले की मी रिटायर्ड होत आहे. तू हे सगळं का सांभाळत नाहीस. तेव्हा मी नुकतंच या क्षेत्रात पाऊल ठेवलं होतं. मला प्रोडक्शन चांगल्याप्रकारे समजतं, असं वाटतं. सिनेमा बनवण्याच्या प्रक्रियेतील ही सगळ्यात कठीण गोष्ट आहे".
त्याबरोबरच आमिर खानच्या फ्लॉप सिनेमांमुळे त्याच्यावर काहीही प्रभाव न पडल्याचा खुलासाही जुनैदने केला. "त्यांनी चांगलं काम केलं आहे. सिनेमा बनवणं हे कोणतं सायन्स नाही. त्यामुळे प्रत्येकाने नेहमी शिकत राहिलं पाहिजे आणि पुढे जात राहिलं पाहिजे", असंही जुनैद म्हणाला. दरम्यान, जुनैदचा महाराज सिनेमा २१ जूनला प्रदर्शित झाला होता. नेटफ्लिक्सवर आमिरच्या लेकाचा हा सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. या सिनेमात जुनैद खान, शर्वरी वाघ, जयदीप अहलावत यांच्या मुख्य भूमिका होत्या.