Taraka Ratna Death: साऊथ सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ज्युनिअर एनटीआर याचा चुलत भाऊ व टॉलिवूडचे अभिनेते नंदमुरी तारक रत्न यांचे शनिवारी निधन झाले. वयाच्या ३९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून बंगळुरुमधील एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. शनिवार (१८ फेब्रुवारी) उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. तारक रत्न हे तेलगू देसम पक्षाचे नेते होते.तारक रत्न हे गेल्या महिन्यात आंध्र प्रदेशच्या चित्तूर जिल्ह्यात तेलगू देसम पक्षाच्या पदयात्रेत सहभागी झाले होते. कुप्पम येथे पदयात्रेदरम्यान ह्रदयविकाराचा झटका आल्याने तारक रत्न रस्त्यावर कोसळले होते. लगेचच त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.
रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तारक रत्न कोमात होते. त्यांना इंट्रा-ऑर्टिक बलून पंप (एबीपी) आणि व्हॅसोएक्टिव्ह सपोर्टवर बलून अँजिओप्लास्टीसह अँटीरियर वॉल मायोकार्डियल इन्फेक्शन झालं होतं. इन्फेक्शन झाल्यानंतर कार्डिओजेनिक शॉकमुळे त्यांची प्रकृती गंभीर होती. याचदरम्यान काल त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर साऊथ चित्रपटसृृष्टीवर शोककळा पसरली आहे. राजकीय गोटातही शोकाकूल वातावरण आहे.
तारक रत्न हे अभिनेते आणि आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.टी.रामा राव यांचे नातू आणि मोहन कृष्णा यांचे सुपुत्र आहेत. ज्युनिअर एनटीआर हा त्यांचा चुलत भाऊ आहे. २००२ मध्ये तारक रत्न यांनी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपटांमध्ये काम केले आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ओटीटीवर पर्दापण केले होते.