पॉप सिंगर जस्टिन बीबरला खूपच कमी वयात लोकप्रियता मिळाली. तो केवळ 13 वर्षांचा असताना तो ग्लोबल स्टार बनला. त्याने आजवर त्याच्या आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. मिरर डॉटने दिलेल्या वृत्तानुसार, 25 वर्षीय जस्टिन बीबरने इन्स्टाग्रामला एक मोठी पोस्ट लिहून त्याच्या आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलेल्या या गोष्टी त्याच्या फॅन्ससाठी अतिशय नवीन असून ही पोस्ट वाचून त्याच्या फॅन्सना धक्का बसत आहे.
जस्टिन बीबरने पोस्ट लिहून लहान वयात मिळालेल्या प्रसिद्धीमुळे त्याला किती फायदे आणि तोटे झाले याबाबत लिहिले आहे. त्याने या पोस्टमधून खुलासा केला आहे की, तो कुमारवयीन असताना त्याला ड्रग्सचे व्यसन लागले होते. जस्टिनने इन्स्टाग्रामवर एक भली मोठी पोस्ट लिहिली आहे.
त्यात त्याने म्हटले आहे की, तुमच्या आयुष्यात तुमच्यावर अनेक जबाबदारींचे ओझे असेल, तेव्हा सकाळी उठताना तुमच्यावर नेहमीच एक दडपण असते. तुमच्या आयुष्यात एकानंतर एक समस्या येत आहेत असे तुम्हाला वाटत असेल तर भीतीच्या ओझ्याखाली तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे काय होणार याचा विचार करू लागतात आणि तुमच्या आयुष्यात सगळे काही वाईटच होणार असे तुम्हाला वाटू लागते. भूतकाळात घडलेल्या अनेक वाईट गोष्टींना तुम्हाला अनेकवेळा तोंड द्यावे लागते.
त्याने पुढे लिहिले आहे की, मी केवळ 19 वर्षांचा असताना मी ड्रग्सच्या अधीन गेलो होतो. या सगळ्याचा माझ्या आयुष्यातील जवळच्या नात्यांवर परिणाम झाला होता. महिलांबाबत माझे मत अतिशय वाईट बनले होते. मी त्यांच्यावर काहीही कारण नसताना चिडायचो, त्यांचा अपमान करायचो. माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्याच लोकांपासून मी खूप दूर गेलो होतो. मी या सगळ्यातून कधीच बाहेर पडणार नाही असेच मला त्यावेळी वाटायला लागले होते. पण काही काळानंतर मी या सगळ्यातून बाहेर पडलो. मला या सगळ्यातून बाहेर पडताना खूप त्रास झाला होता. पण या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी माझ्या जवळच्या काही लोकांनी मला मदत केली. माझ्या आयुष्यातील या लोकांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन.