मुंबई : बॉलिवूडच्या इतिहासात असा एकुलता एक दिग्दर्शक आहे ज्याने एक सिनेमा तयार करण्यासाठी आयुष्यातील 14 वर्ष वेळ दिला. आता तुम्हीही विचारात पडला असाल की, कोण आहे हा दिग्दर्शक? तर त्याचं नाव आहे के. आसिफ. याच दिग्दर्शकाने ऐतिहासिक 'मुगल-ए-आझम' हा सिनेमा केला होता.
'मुगल-ए-आझम' हा सिनेमा पूर्ण होण्यासाठी 14 वर्ष वाट पहावी लागली. हा सिनेमा त्या काळातील सर्वात महागड्या सिनेमांपैकी एक होता. हा सिनेमा तयार करण्यासाठी 1.5 कोटी रुपये लागल्याचं बोललं जातं. चला जाणून घेऊ या सिनेमाच्या दिग्दर्शकाबाबत आणि या सिनेमाबाबत काही रंजक गोष्टी.
के. आसिफ यांचं पूर्ण नाव कमरुद्दीन आसिफ असं होतं. त्यांनी त्यांच्या 3 दशकांच्या करिअरमध्ये प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन केलं. त्यांचं करिअर जरी 3 दशकांचं असलं तरी त्यांनी केवळ 3 ते 4 सिनेमांचीच निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. पण हेच सिनेमे त्यांनी पूर्ण मेहनतीने आणि पॅशनने केले.
के. आसिफ यांचा जन्स 14 जून 1922 मध्ये उत्तरप्रदेशच्या इटावामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. 40 च्या दशकात काहीतरी काम मिळवण्यासाठी ते मामाकडे मुंबईत आले. इथे त्यांच्या मामाचं टेलरींग काम होतं. इथे त्यांचे मामा सिनेमासाठी कपडे पुरवण्याचं काम करत होते. सोबतच त्यांनी छोट्या छोट्या 2-3 सिनेमांची निर्मितीही केली होती.
1945 मध्ये दिग्दर्शक म्हणून 'फूल' सिनेमाने सुरुवात केली होती. पृथ्वीराज कपूर, सुरैया आणि दुर्गा खोटे यांचेसारखी मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. या सिनेमाच्या यशानंतर के. आसिफ यांनी 'मुगल-ए-आझम' सिनेमा करण्याचा निश्चय केला.
या सिनेमातील 'प्यार किया तो डरना क्या' या गाण्यासाठी त्यांनी त्यावेळी 10 लाख रुपये खर्च केला होता. त्यावेळी ही फार मोठी रक्कम होती. 105 गाणे रिजेक्ट केल्यानंतर नौशाद यांनी हे गाणं निवडलं होतं. हे गाणं आजही त्याच्या प्रेझेंटेशनसाठी ओळखलं जातं. याच सिनेमातील ऐ मोहब्बत झिंदाबाद या गाण्यासाठी मोहम्मद रफी यांच्यासोबत तब्बल 100 गायकांनी कोरस गायला होता.