Join us

या कारणामुळे कादर खान यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा भडकला होता गोविंदावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 5:18 PM

कादर खान आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.

ठळक मुद्देगोविंदा माझ्या वडिलांना पित्यासारखा मानायचा तर त्यांची प्रकृती बिघडल्यावर गोविंदाने त्यांना कितीदा फोन केला? इतक्या वर्षांत त्याने कितीदा त्यांची विचारपूस केली? असा संतप्त सवाल सरफराजने केला होता.

अभिनेता, कॉमेडियन, दिग्दर्शक आणि संवाद लेखक कादर खान यांना अखेरीस ‘हो गया दिमाग का दही’ या चित्रपटात बघावयास मिळाले होते. अनेक हिट चित्रपटात काम करणाऱ्या कादर खान यांनी अभिनयासोबतच कुली, मुकद्दर का सिकंदर, लावारिस, शराबी आणि अमर-अकबर-अ‍ॅँथनी यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांचे संवाद लिहिले होते. कादर खान यांचे 31 डिसेंबर 2018 ला निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. 

कादर खान आणि गोविंदा यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. अभिनेता गोविंदाने कादर खान यांच्या निधनानंतर इन्स्टाग्रामवर कादर खान यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला होता आणि ते त्याला वडिलांच्या स्थानी असल्याचे म्हटले होते. त्याने पोस्टमध्ये लिहिले होते की, कादर खान केवळ माझे ‘उस्ताद’ नव्हते तर माझ्या पित्यासारखे होते. पण कादर खान यांचा मुलगा सरफराज याला मात्र गोविंदाचे हे शब्द जराही रूचले नव्हते.

गोविंदा माझ्या वडिलांना पित्यासारखा मानायचा तर त्यांची प्रकृती बिघडल्यावर गोविंदाने त्यांना कितीदा फोन केला? इतक्या वर्षांत त्याने कितीदा त्यांची विचारपूस केली? असा संतप्त सवाल सरफराजने केला होता. गोविंदाने ना माझे वडील हयात असताना त्यांची चौकशी केली, ना ते गेल्यावर आम्हाला एक फोन करून सांत्वन व्यक्त करण्याचे सौजन्य दाखवले होते. हे चित्रपटसृष्टीचेच वास्तव आहे. इथे कुणीच खरे नाही. सगळे केवळ खोटा आव आणतात, असे सरफराजने आएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

सरफराज पुढे म्हणाला होता की, इंडस्ट्रीतील अनेकांशी माझ्या वडिलांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण एकच अशी व्यक्ती होती, जी माझ्या वडिलांना प्रचंड आवडायची, ती व्यक्ती म्हणजे, बच्चन साहेब (अमिताभ बच्चन). इंडस्ट्रीतील कुणाची तुम्हाला सर्वाधिक आठवण येते, असे मी नेहमी त्यांना विचारायचो. यावर ते बच्चन साहेब, हे एकच नाव घ्यायचे. माझ्या वडिलांनी अखेरच्या काळापर्यंत बच्चन साहेबांची आठवण काढली, हे बच्चन साहेबांपर्यंत पोहोचावे, अशी माझी इच्छा आहे.

 

अमिताभ बच्चन आणि गोविंदा या दोघांसोबतही कादर खान यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. अमिताभ यांच्या बहुतांश गाजलेल्या चित्रपटाच्या पटकथा कादर खान यांनीच लिहिल्या. हिरो नंबर १ , अनाडी नंबर १, जोरू का गुलाम, अखियोंसे गोली मारे, दुल्हे राजा, हसीना मान जायेगी, आँटी नंबर १ यांसारख्या चित्रपटात कादर खान आणि गोविंदा यांनी एकत्र काम केले होते. गोविंदाची प्रमुख भूमिका असलेल्या कुली नंबर १, राजा बाबू, साजन चले ससुराल यांसारख्या चित्रपटांच्या कथाही त्यांनी लिहिल्या होत्या.

टॅग्स :कादर खानगोविंदा