रोहित शेट्टी दिग्दर्शित सुपरहिट 'सिंघम' (Singham) २०११ मध्ये रिलीज झाला होता. अजय देवगणला तेव्हापासूनच बाजीराव सिंघम ही नवी ओळख मिळाली. प्रेक्षकांनी या सिनेमाला अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. काही वर्षांनी 'सिंघम रिटर्न्स' आला आणि आता 'सिंघम अगेन' येत आहे. मात्र पहिल्या सिंघममध्ये मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) सिनेमाच्या सीक्वेलमध्ये नंतर दिसली नाही. 'सिंघम रिटर्न्स' आणि 'सिंघम अगेन'चा भाग नसणाऱ्यावर काजलने नुकतंच भाष्य केलं आहे.
काजल अग्रवाल दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे. 'सिंघम' मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक झालं होतं. मात्र नंतर २०१४ साली आलेल्या 'सिंघम रिटर्न्स' मध्ये करीना कपूर दिसली. तर आता येणाऱ्या 'सिंघम अगेन' मध्येही करीना कपूरच अजय देवगणची हिरोईन आहे. सिंघमच्या सीक्वेलचा भाग नसण्यावर काजल म्हणाली, "मला या सिनेमाचा भाग व्हायचं होतं की नाही हे सांगणं खरंच अवघड आहे. कारण कलाकार म्हणून आम्ही सगळेच लालची असतो. सगळ्यांनाच सिनेमांमध्ये काम करण्याची गरज असते. प्रत्येक सिनेमात आपली भूमिका असावी असंच आपल्याला वाटत असतं."
ती पुढे म्हणाली, "मी रोहित शेट्टीची चाहती आहे. त्यांच्या कॉप युनिव्हर्समधले सर्व सिनेमे मी पाहिले आहेत आणि मला ते आवडलेही आहेत. त्यांनी ज्याप्रकारे सगळं कनेक्ट करुन गोष्ट तयार केली आहे हे खूप छान आहे. सध्या मी त्यांच्या संपर्कात नाही. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त आहे. पण आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा मजा मस्ती करतो, खूप गप्पा मारतो. मी सिंघम अगेनचा ट्रेलर पाहिला. ट्रेलर पाहून मला खूपच उत्साह आला आहे. मी सिनेमाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. सिंघममुळेच मला हिंदी प्रेक्षकांचंही खूप प्रेम मिळालं आहे."