बॉलिवूड अभिनेत्री काजोल (kajol) लवकरच ‘द ट्रायल : प्यार, कानून, धोखा’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. त्यामुळे सध्या ती या सीरिजचं जोरदार प्रमोशन करत आहे. यामध्ये अलिकडेच तिने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने राजकारण्यांविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. इतकंच नाही तर सोशल मीडियावर ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली. ज्यामुळे तिला आता जाहीरपणे त्या वक्तव्याचं स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.
काय म्हणाली होती काजोल?
काजोलने अलिकडेच 'द क्विंट'ला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ती महिला सशक्तीकरणावर भाष्य करत होती. यावेळी, “भारतासारख्या देशात बदल हा फार मंद गतीने होत आहे. हा बदल अत्यंत संथ गतीने होत आहे. कारण, आपण आपल्या परंपरा आणि विचारप्रक्रिया यांच्यामध्येच अडकलो आहोत. अर्थात, या सगळ्याचा संबंध थेट शिक्षणाशी आहे. आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत, ज्यांना शैक्षणिक व्यवस्थेची कोणतीही पार्श्वभूमी नाही", असं काजोल म्हणाली होती.
काजोलने हे वक्तव्य केल्यानंतर सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. इतकंच नाहीतर, 'घराणेशाहीमुळे वर आलेली काजोल स्वत: निरक्षर आहे. तिने शाळा सोडलेली आहे. नवरा कॅन्सर (गुटख्याची जाहिरात) विकतो आणि हिचा कॉन्फिडन्स पाहा', असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. सोशल मीडियावर झालेल्या या ट्रोलिंगनंतर काजोलने तिचं स्पष्टीकरण दिलं आहे.
काय आहे काजोलचं स्पष्टीकरण
काजोलने शनिवारी ट्विट करत तिचं स्पष्टीकरण दिलं आहे. "मी फक्त शिक्षण आणि त्याचं महत्त्व याबद्दल माझं मत मांडलं होतं. कोणत्याही राजकीय नेत्याची बदनामी करण्याचा माझा हेतू नव्हता. आपल्याकडे असे काही नेते आहेत जे देशाला योग्य मार्गावर नेण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत", असं म्हणत काजोलने तिचं स्पष्टीकरण दिलं आहे.